गीतांजली एक्स्प्रेस रोखून रेल रोको आंदोलन
By admin | Published: June 30, 2015 01:19 AM2015-06-30T01:19:04+5:302015-06-30T01:21:05+5:30
गीतांजली एक्स्प्रेस रोखून रेल रोको आंदोलन
नाशिकरोड : मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला मनमाडला थांबा द्यावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी कामगार प्रवाशांनी अचानक गीतांजली एक्स्प्रेस रोखून रेल रोको आंदोलन केले. यामुळे रेल्वे प्रशासन-पोलिसांची तारांबळ उडाली होती. रेल्वे सुरक्षा दलाने रेल रोको आंदोलन करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस ही सकाळी साडेनऊ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येते. त्यानंतर गीतांजलीला जळगाव येथे थांबा देण्यात आलेला आहे. गीतांजली एक्स्प्रेसला मनमाडला थांबा देण्यात यावा, अशी अनेक दिवसांपासून नाशिकरोडहून कामानिमित्त मनमाडला जाणाऱ्या कामगार, शिक्षक, विद्यार्थी आदिंची मागणी आहे. चाकरमान्यांच्या नोकरीच्या वेळेनुसार गीतांजली एक्स्प्रेसची वेळ योग्य आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने गीतांजलीला मनमाडला थांबा द्यावा याकडे लक्ष दिलेले नाही. नाशिकरोडहून दररोज मनमाड व आजूबाजूच्या ठिकाणी व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदिंकरिता जाणाऱ्या शेकडो प्रवाशांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणा देत गीतांजली एक्स्प्रेस रोखून धरली. यामुळे रेल्वे प्रशासन व पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या रेल रोको आंदोलनामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल रोको आंदोलन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मार्गावरून बाजूला सारत गीतांजली एक्स्प्रेसला रवाना केले. रेल रोको आंदोलन करणारे हेमंत भट, सोपान डोखे, भाऊलाल मोरे, ज्योती पवार, तनुजा आहेर, कुसुम पवार, शैला जाधव, कल्पना काठे सर्व राहणार नाशिक या आठ जणांविरूद्ध रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे कायदा १७४ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला. रेल रोको आंदोलन करणाऱ्या आठ प्रवाशांना रेल्वे न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठवून पुन्हा अशा प्रकारे अनधिकृतपणे आंदोलन करू नये अशी तंबी दिली. (प्रतिनिधी)