मालेगावसाठी चणकापूरचे पाणी द्या
By Admin | Published: October 19, 2015 11:52 PM2015-10-19T23:52:10+5:302015-10-19T23:53:19+5:30
मनपा आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आझादनगर : मालेगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी चणकापूर धरणातून एक हजार ९०० दलघफू पाणी मालेगावला देण्यात यावे, अशी मागणी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकारी कार्यालयात चणकापूर धरणातील पाणीप्रश्नी आयोजित बैठकीत बोर्डे बोलत होते.
मालेगाव शहरासाठी चणकापूर धरणात १३५० दलघफू पाण्याचे आरक्षण आहे; मात्र शहराची वाढलेली लोकसंख्या, हद्दवाढ गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे व भविष्यात अधिक तीव्र होणार आहे. आजमितीस शहरास तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यंदा चणकापूर धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. त्यामुळे शहरास लागणाऱ्या पाणीची आवश्यकता लक्षात घेता १९०० दलघफू पाण्याचे आरक्षण करावे, अशी मागणी आयुक्त बोर्डे यांनी केली. आता पाणी वाटपाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीकडे शहरवासीयांचे लक्ष लगले आहे. (वार्ताहर)