मुलांना लहानपणापासून प्रयोगाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावा : कानेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:44 AM2018-09-04T00:44:07+5:302018-09-04T00:44:33+5:30
मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते.
नाशिक : मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते. सायन्स पार्क, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कानेरे पुढे म्हणाले, विज्ञानाच्या प्रयोगांचा मुलांना लहानपणीच परिचय करून द्यावा म्हणजे मोठेपणी त्यांना त्यात विशेष आवड निर्माण होते. करिअर निवडीत त्याचा उपयोग होतो. कार्यशाळेचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे डॉ. मो. स. गोसावी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. एचपीटीचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आशिष चौरासिया यांनी आभार मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष विज्ञान पदवीचे विद्यार्थी, पदव्युत्तरचे विद्यार्थी व शहरातील विविध शाळांमधील २५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्स इंडिया, महेश दाबक आदींचे सहकार्य लाभले.
विविध प्रयोग सादर
विज्ञान शिक्षकांनी विज्ञान शिकवण्यासाठी मजेशीर युक्त्यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी लाईफ सायन्स, फिजिक्स या विषयावर सायन्स पार्कच्या चमूतर्फे विविध प्रयोग करून दाखवण्यात आले.