पावणेदोनशे कोटींच्या ठेवी द्या
By admin | Published: May 27, 2017 12:49 AM2017-05-27T00:49:13+5:302017-05-27T00:49:20+5:30
नाशिक : राज्य शिखर बॅँकेच्या अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यास सशर्त मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य शिखर बॅँकेकडून मदत हवी असल्यास राज्य शिखर बॅँकेच्या अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यास शुक्रवारी (दि. २६) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सशर्त मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली.
जिल्हा बॅँकेच्या द्वारका येथील मुख्यालयात संचालक मंडळाची तातडीची मासिक बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत विविध प्रकारच्या १६ विषयांवर चर्चा झाली. राज्य शिखर बॅँकेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा बॅँकेच्या रिक्त असलेल्या कार्यकारी संचालकपदावर राज्य शिखर बॅँकेच्या व्यवस्थापकांच्या नियुक्तीचा विषय मंजुरीसाठी बैठकीत ठेवण्यात आला होता. ही नियुक्ती १६ प्रकारच्या विविध अटी-शर्तींवर देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यातील सुरुवातीच्या १ ते ११ अटी-शर्ती मान्य करण्यात येऊन राज्य शिखर बॅँकेच्या कार्यकारी संचालकांना जिल्हा बॅँकेवर नियुक्तीस हिरवा कंदील दाखविण्यात आला; मात्र १२ ते १६ क्रमाकांच्या अटी-शर्ती मान्य नसल्याचे संचालकांचे म्हणणे आहे.
यातील १२ ते १६ क्रमांकांच्या अटी-शर्ती जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यात एखाद्या विषयावर एकमत नसल्यास त्या विषयावर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिखर बॅँकेला देण्यात यावे, या अटीस संचालक मंडळाने मान्यता दिली नसल्याचे कळते.
बैठकीस उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेज कोकणी, किशोर दराडे, गणपतराव पाटील यांच्यासह १३ ते १४ संचालक उपस्थित असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.