जातपडताळणी सादर करण्यास मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:56+5:302021-01-20T04:15:56+5:30
नाशिक : विविध विद्याशाखांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महासीईटीने वाढवून दिलेली मुदत बुधवारी (दि.२०) संपणार आहे. मात्र अजूनही ...
नाशिक : विविध विद्याशाखांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महासीईटीने वाढवून दिलेली मुदत बुधवारी (दि.२०) संपणार आहे. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. जातपडताळणीस विलंब होत असल्याने हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी भारतीय विद्यार्थी सेनेच्या नाशिक शाखेने केली आहे. विविध विद्याशाखांना राखीव प्रवर्गातून प्रवेशासह शैक्षणिक शुल्कात सवलत व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र समाजकल्याण विभागातील जातपडताळणी समितीकडे हजारोंच्या संख्येनेे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. हे प्रमाणपत्र जमा न केल्यास विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेना शाखेतर्फे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यापूर्वी देण्यात आलेली ४ दिवसांची मुदतवाढ बुधवारी संपुष्टात येणार असताना अनेक विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळू शकले नसल्याचे नमूद करीत युवा सेना नाशिक शहर विस्तारक सिद्धेश शिंदे यांच्यासह भारतीय विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल जाधव, विहार चौधरी, योगेश पगार आदी उपस्थित होते.
(आरफोटो-१९शिवसेना युवा सेना) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सिद्धेश शिंदे, वैभव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल जाधव, विहार चौधरी, योगेश पगार आदी.