‘देव द्या, देवपण घ्या...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:26 AM2017-08-29T01:26:43+5:302017-08-29T01:26:51+5:30
नदी आणि नदीमधील जलचर प्राणी यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांचा त्रास होऊ नये, या उद्देशाने शहरातील तरुणाई सात वर्षांपूर्वी एकत्र आली. विद्यार्थी कृती समिती नावाने या तरुणाईच्या गोदा सेवकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढचे पाऊल टाकले. ‘मूर्ती दानाचे महत्त्व अन् काळाची गरज’ या विषयावर माहिती पत्रक तयार करून त्यांचे वाटप व मूर्ती संकलनाचे ‘देव द्या, देवपण घ्या’ नावाने अभियान हाती घेतले.
नदी आणि नदीमधील जलचर प्राणी यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांचा त्रास होऊ नये, या उद्देशाने शहरातील तरुणाई सात वर्षांपूर्वी एकत्र आली. विद्यार्थी कृती समिती नावाने या तरुणाईच्या गोदा सेवकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढचे पाऊल टाकले. ‘मूर्ती दानाचे महत्त्व अन् काळाची गरज’ या विषयावर माहिती पत्रक तयार करून त्यांचे वाटप व मूर्ती संकलनाचे ‘देव द्या, देवपण घ्या’ नावाने अभियान हाती घेतले. २०११ साली या तरुणाईच्या समितीने हा उपक्रम पहिल्यांदा राबविला. गंगापूररोड-हनुमानवाडी लिंकरोडच्या प्रारंभी गोदापार्क ही जागा यासाठी निश्चित केली गेली. खरे तर सदर परिसर अत्यंत उच्चभ्रू समजला जातो; मात्र तरीही तरुणाईला काही दगडांचा प्रसाद सुरुवातीला मिळाला. मात्र यामधून खचून न जाता हाती घेतलेला उपक्रम अखंडित राबविण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात होती. यामुळे आजतागायत उपक्रम सुरू असून, पहिल्या वर्षात आलेला कटू अनुभव पुन्हा आला नसल्याचे या समितीचे प्रमुख आकाश पगार सांगतात. दरम्यान, मूर्ती दान करणाºया भक्ताचे नाव, पत्ता, क्रमांक आदी माहिती नोंदवून घेतली जाते. यावेळी ध्वनिक्षेपकावरून संबंधित भक्तांचे अभिनंदन करत आभार मानले जाते. संकलित झालेल्या मूर्ती महापालिकेच्या वाहनांमध्ये सुपूर्द केल्या जातात. विशाल गांगुर्डे, रोहित कळमकर, जयंत सोनवणे, सागर बाविस्कर, प्रशांत खंडाळकर, राहुल मकवाना, सिद्धांत आमले, विजय विश्वकर्मा, पूजा सावंत, नेहा सूर्यवंशी, जागृती आहेर, दीपाली जाधव आदी. नाशिककरांमध्ये जागृती झाली आणि त्याचे फलित म्हणून मागील वर्षी सुमारे १७ हजार मूर्तींचे संकलन करण्यास या समितीला यश आले. समितीचे दीडशे-दोनशे स्वयंसेवक यासाठी प्रयत्नशील आहेत. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. दरम्यान, घरोघरी जाऊन माहिती पत्रकांचे वाटप करून त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कृत्रिम तलावाची व्यवस्था करत समितीद्वारे मूर्ती संकलन केले जाते. यावेळी भाविकांना बाप्पाची आरती करण्यासाठी योग्य जागेची व्यवस्थाही करून दिली जाते.