मागेल त्याला नळजोडणी द्या!
By admin | Published: March 25, 2017 12:21 AM2017-03-25T00:21:13+5:302017-03-25T00:21:42+5:30
नाशिक : मागेल त्याला नळजोडणी देण्याचे आदेश देतानाच मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलून ती पहाटे करण्याच्या सूचना महापौर रंजना भानसी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
नाशिक : थकबाकीदार नसलेल्या सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये मागेल त्याला नळजोडणी देण्याचे आदेश देतानाच अनेक भागांत मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलून ती पहाटे करण्याच्या सूचना महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्या. दरम्यान, मागेल त्याला नळजोडणी देतानाच इमारतींमधील वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचण्याची हमी मात्र महापालिका देणार नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापौर रंजना भानसी यांनी घेतली. या आढावा बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते व भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर उपस्थित होते. महापालिकेकडून इमारतीतील सदनिकाधारकांना स्वतंत्रपणे नळजोडणी दिली जात नाही. परंतु, अनेक ठिकाणी वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मागेल त्याला नळजोडणी द्या. मात्र, सदर नळजोडणीधारकाने मोटर लावून पाणी खेचण्याचा प्रयत्न केला तर मोटारी जप्त करून कारवाई करण्याचेही आदेश महापौरांनी दिले. याचबरोबर काही भागांत मध्यरात्रीनंतर २ वाजता पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महिला वर्गाची मोठी गैरसोय होते. सदर मध्यरात्रीनंतरचा पाणीपुरवठा तातडीने बंद करून तो पहाटे करण्याचे व त्यासाठी येत्या १५ दिवसांत नियोजन करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. सिडको-नाशिकरोड भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत; मात्र पाण्याचे समान वितरण झाले पाहिजे. कमी व्यासाच्या पाइपलाइन बदलण्याची कार्यवाही करावी, अमृत योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या नवीन १८ जलकुंभांचे काम करताना आजूबाजूच्या भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, रस्त्यांच्या खडीकरण-डांबरीकरणाचे नियोजन करताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचेही नियोजन झाले पाहिजे, व्हॉल्व्हच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे, गळती थांबवावी, गावठाणातही पाणीपुरवठा सुरळीत करावा, नादुरुस्त विंधनविहिरींची दुरुस्ती करण्यात यावी, अशा सूचना देत महापौरांनी पाणीपुरवठा विषयक प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटरा करण्याचेही आदेश दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी यांच्यासह उपअभियंता उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाणीगळती थांबवा
गंगापूर धरणात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीपुरवठा असून, आतापर्यंत गंगापूर धरणातून २१५३ दलघफू तर दारणातून १४५ दलघफू पाणी उचलण्यात आले आहे. गंगापूर धरणातील १७४६ दलघफू, तर दारणातील २६२ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन ४१५ ते ४१८ दसलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण महसुली गळती ही ४० टक्के असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. त्यावर महापौरांनी पाणीगळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यासाठी खासगी एजन्सीची मदत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
३० व्हॉल्व्हमनची भरती
सद्यस्थितीत व्हॉल्व्हमनची संख्या खूपच अपुरी असल्याचे कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनी सांगितले. परंतु, ताप्तुरत्या स्वरूपात ३० व्हॉल्व्हमनची भरती करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. व्हॉल्व्हमनसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच वॉटर आॅडिट चालू असल्याने त्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीपुरवठा व्यवस्थापनात बरीच सुधारणा होणार असल्याचा दावाही चव्हाणके यांनी केला.