विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव द्या
By admin | Published: September 6, 2015 10:41 PM2015-09-06T22:41:54+5:302015-09-06T22:42:30+5:30
दिलीप धोंडगे : लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आवाहन
सिन्नर : शिक्षक हा प्रथम विद्यार्थी असतो. त्याच्या ज्ञान प्राप्तीला अंत नसतो. सतत शिक्षण मिळवतो तो शिक्षक. अशा प्रत्येक शिक्षकाने शिकवताना विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळेल, असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.
लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने तालुक्यातील आदर्श शिक्षक व जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सिन्नर महाविद्यालयात झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर मविप्रचे संचालक व लायन्स क्लबचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत नाईक, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, घनश्याम देशमुख, जितेंद्र जगताप, गोरख काळुंगे आदि मान्यवर उपस्थित होते.
भारत देश सर्व अंगांनी समृद्ध होण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असून प्राथमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शिक्षकच हे काम करू शकतात, असे डॉ. धोंडगे म्हणाले. त्यांनी यावेळी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन शिक्षकाचे महत्त्व पटवून दिले. देश महासत्ता व्हावे यासाठी डॉ. कलाम यांना आपले काम करताना मृत्यू येणे म्हणजे त्यांना मृत्यूने सलाम करणे असल्याचे ते म्हणाले. डॉ. धोंडगे यांनी यावेळी डॉ. कलाम यांच्यासह महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शिक्षकी बाण्याचा विशेष आढावा घेतला.
लायन्स कल्बचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीकडून राबविण्यात येत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी घनश्याम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, डॉ. विष्णू अत्रे, सुमंत गुजराथी, जे. बी. पगार, जी. बी. मोरे, मनीष गुजराथी, डॉ. रमेश जगताप, किरण कटारिया, सुरेश कट्यारे, संजय झगडे, डॉ. भारत गारे, डॉ. उमेश येवेलेकर, पांडुरंग वारुंगसे, संजय सानप, त्र्यंबक खालकर, दत्ता शेळके, तेजस्विनी वाजे, संगिता कट्यारे, शिल्पा गुजराथी, डॉ. सुजाता लोहारकर आदिंसह नागरिक उपस्थित होते. डॉ. विजय
लोहारकर यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र जगताप यांनी आभार मानले.(वार्ताहर)