माझी किडनी मला परत द्या, पतीविरोधात पीडित पत्नीची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:00 AM2019-06-20T10:00:13+5:302019-06-20T10:01:05+5:30
पतीचा त्रास असह्य झाल्याने अश्रूंना वाट मोकळी करुन देणाऱ्या पत्नीची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही भावनिक झाले.
नाशिक - आपल्या पतीला दिलेली किडनी परत मिळावी, यासाठी पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या वागण्यात सुधारणा होत नसून दारूचे व्यसनही सोडत नाही. त्यामुळे वैतागलेल्या पीडित पत्नीने थेट सातपूर पोलीस ठाण्यात रडत-रडत धाव घेतली. सुरुवातील पती-पत्नीचे किरकोळ भांडण असा समज झाल्याने पोलिसांनीही वाद समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीचा त्रास असह्य झाल्याने अश्रूंना वाट मोकळी करुन देणाऱ्या पत्नीची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही भावनिक झाले.
विक्रम वडतिले यास दारुचे व्यसन होते, तरीही आई-वडिल आणि नातेवाईकांच्या संमतीने वैशाली (27) हिचा विवाह विक्रम याच्याशी लावण्यात आला. त्यानंतर, काही दिवसांतच विक्रम आजारी पडला. त्यावेळी, त्याच्या दोन्ही किडन्या (मुत्रपिंड) निकामा असल्याचं वैद्यकीय तपासात पुढे आले. म्हणून, आपला जोडीदार काही दिवसांचा सोबती असल्याचे ऐकताच वैशालीने नातेवाईंकाचा विरोध झुगारून पतीला किडनी देऊ केली. पत्नीच्या एका किडनीमुळे विक्रमला जीवदान मिळाले. आतातरी, आपला संसार सुखाने होईल, पती विकमला दारूमुळे जीव गमवावा लागतो हे लक्षात आलं असेल, असे पत्नी वैशालीला वाटले. मात्र, किडनी प्रत्यारोपणाच्या काही दिवसानंतर विक्रमने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली. विक्रम पुन्हा दारूच्या आहारी जात पत्नीला त्रास देऊ लागला. आपला जीव वाचविणाऱ्या पत्नीचा जीवघेणा छळ करू लागला. त्यामुळे पीडित पत्नीने सातपूर पोलीस स्टेशन गाठले. तसेच, पतीला दान केलेली किडनी परत मिळावी, यासाठी तक्रारी अर्जही दाखल केला आहे. मात्र, पत्नीच्या या विचित्र तक्रारीनंतर पोलीसही संभ्रमात पडले आहेत.