मुद्रांक विक्रेत्यांना तहसील आवारात जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:36+5:302021-09-15T04:18:36+5:30
देवळा : अद्यापही शहरातील जुन्या तहसील आवारातच बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांना नवीन तहसील आवारात बसण्यासाठी जागा देण्यात यावी या ...
देवळा : अद्यापही शहरातील जुन्या तहसील आवारातच बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांना नवीन तहसील आवारात बसण्यासाठी जागा देण्यात यावी या मागणीसाठी देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले. दुपारी १ वाजेपर्यंत शासनाने आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलनस्थळी वाघ्या-मुरळी पथकाचा कार्यक्रम करून शासनाचा निषेध केला.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काळात शहरात निवडणूक प्रक्रियेस गैरसोय होत असल्याचे कारण दाखवत कोणतीही पूर्वसूचना न देता देवळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयाचे शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या देवळा-वाजगाव रस्त्यावरील जुना मारुती मंदिर परिसरात नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्यात आले. परंतु संपूर्ण कार्यालय स्थलांतर न करता सेतू कार्यालय व मुद्रांक विक्रेते जुन्याच जागेवर राहिले. यामुळे विविध दाखले मिळवताना नागरिकांना द्रविडी प्राणायाम करावा लागत असून, यात पैशांचा व वेळेचा अपव्यय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे व महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. स्वतःचे वाहन नसलेल्या नागरिकांना उन्हात पायपीट करीत एवढ्या दूर अंतरावर जावे लागते. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, संजय दहिवडकर, बापू देवरे, दशरथ पूरकर, शशिकांत पवार, अर्जुन देवरे, काकाजी देवरे, भाऊसाहेब मोरे आदी सहभागी झाले होते. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, ना. बच्चू कडू, उपविभागीय अधिकारी चांदवड, तहसीलदार, देवळा, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.
-----------------
मुद्रांक विक्रेत्यांना नवीन प्रशासकीय इमारत आवारात सोमवारपर्यंत (दि. १३) स्थलांतरित न केल्यास प्रहार शेतकरी संघटनेमार्फत मंगळवारपासून (दि. १४) जुने तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने देवळा तालुका प्रहार संघटनेने शहरातील पाच कंदील चौकात जुन्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनस्थळी वाघ्या-मुरळी कार्यक्रम केला. शासनाच्या निर्बंधामुळे त्रस्त झालेल्या वाघ्या-मुरळी पथकातील कलाकारांनी यावेळी लोकसंगीताचा कार्यक्रम सादर करून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
-----------------------
देवळा शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर तालुका प्रहार संघटनेचे उपोषण सुरू असताना वाघ्या-मुरळी पथकातील कलाकार लोकसंगीत सादर करताना. (१४ देवळा प्रहार)
140921\14nsk_34_14092021_13.jpg
१४ देवळा प्रहार