दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव कलागुण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:10+5:302020-12-27T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दहावीतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना श्रेणीनिहाय वाढीव कलागुण विद्यार्थ्यांना देण्यात येतात; मात्र यावर्षी कोविड-१९ मुळे या परीक्षाच होऊ शकलेल्या नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीनिहाय वाढीव कलागुण देण्यात यावे, अशी मागणी कलाशिक्षकांनी केली आहे.
स्काउट गाइड कार्यालयात शनिवारी (दि. २६) महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची आमदार सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सहभागी कला शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीनिहाय अतिरिक्त गुण देण्याच्या मागणीसह प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रत्येकी एक कलाशिक्षक, संगीत शिक्षक, पदभरती व्हावी, सध्या माध्यमिक विद्यालयांमध्ये असलेले कलाशिक्षक सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी कलाशिक्षकाचेच पद भरण्यात यावे, अन्य शिक्षकांना मान्यता देऊ नये. त्याचप्रमाणे नववी व दहावीसाठी पूर्वी सुरू असलेला कार्यानुभव अंतर्गत कलारसास्वाद विषय पर्यायी केल्याने कलाशिक्षकांचा चार तासांचा कामाचा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे नववी दहावीसाठी कलाविषय हा सक्तीचा करण्यात यावा आदी मागण्यांवर यावेळी मंथन करण्यात आले. बैठकीला जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, सारंग घोलप, प्रल्हाद साळुखे, सुनील महाले, प्रभाकर शेलार, मोहन क्षीरसागर, पंकज भामरे, महेंद्र झोले आदी उपस्थित होते.
(फोटो- २६ आर्ट टिचर मिटिंग) आमदार सुधीर तांबे यांना कलाशिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देताना कलाशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, सारंग घोलप, प्रल्हाद साळुखे, सुनील महाले, प्रभाकर शेलार, मोहन क्षीरसागर, पंकज भामरे आदी.