पोलिसांच्या ताब्यातील वाहने मालकांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:45 AM2019-03-27T00:45:58+5:302019-03-27T00:47:25+5:30
पोलिसांनी पोलीस ठाण्यात जमा केलेली वाहने वर्षांनुवर्षे पडून सडून जातात. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात भंगार म्हणून पडलेली वाहने मूळ मालकास परत देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
सातपूर : पोलिसांनी पोलीस ठाण्यात जमा केलेली वाहने वर्षांनुवर्षे पडून सडून जातात. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात भंगार म्हणून पडलेली वाहने मूळ मालकास परत देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
पोलिसांच्या ताब्यातील बऱ्याचशा वाहनांना आता अनेक वर्षे उलटून गेल्यामुळे त्यांचे मूळ मालक शोधणे अवघड असले तरी, त्यासाठी तळेगाव दाभाडे येथील वाहन शोध संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. शेकडो वाहने पोलीस ठाण्यात कुजत भंगारात पडलेली आहेत; मात्र पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या प्रयत्नाने व वाहन शोध संस्थेच्या वतीने ही आता मूळ मालकास परत मिळणार असल्याने पोलीस ठाणे परिसर स्वच्छ
होणार आहे.
अपघातात वा चोरीच्या गाड्यांचे मालक हे न्यायालयीन प्रक्रिया, एखादे वाहन परत मिळवायचे असेल तर मूळ फिर्याद, पोलिसांचा पंचनामा अहवाल व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च यातच वाहनचालक मेटाकुटीला येतो. हा खर्च अनेकदा गाडीच्या चालू बाजारमूल्यापेक्षा जादा असल्याने मूळ मालक वाहने ताब्यातच घेत नाहीत.