पर्यटनाला काही क्षण देत स्वत:ला रिचार्ज करा :छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:40 AM2022-03-07T01:40:20+5:302022-03-07T01:40:47+5:30
पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक ८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केले.
एस. बी. कमानकर सायखेडा : पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो. त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक ८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करून अर्थचक्राला गती द्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केले.
नांदूरमधमेश्वर येथे दोन दिवसीय पक्षी महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम भुजबळ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, नाशिकमध्ये येणारे पर्यटक जास्त दिवस थांबावे यादृष्टीने पर्यटनाचा विकास करावा. परंतु, पर्यटनाचा विकास करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची साथ फार महत्त्वाची आहे. रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात पर्यटन विभागाच्या वतीने राबविण्यात येणारा पक्षी महोत्सव हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, पक्षी मित्र आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. माणसाने कितीही प्रगती केली, नवनवीन शोध लावले, चंद्रावर पाऊल ठेवले असले तरी निसर्गाने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, नैसर्गिक साधन संपत्ती हा अनमोल ठेवा आहे, त्याची जपणूक केली पाहिजे. नांदूरमधमेश्वर येथे अजून काही सुविधा आवश्यक असतील तर त्याचा तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा. शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. व्यासपीठावर निफाडच्या प्रांत अर्चना पठारे, पर्यटन विभागाच्या संचालिका मधुमती सरदेसाई, विक्रम आहिर, वन विभागाचे अधीक्षक शेखर देवधर, पक्षी मित्र निफाड तालुका अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, चापडगावच्या सरपंच सुनीता दराडे उपस्थित होत्या.
इन्फो
भुजबळांनी केले पक्षी निरीक्षण
पक्षी महोत्सव समारोपासाठी आलेल्या छगन भुजबळ यांनी चापडगाव शिवारात असलेल्या मनोऱ्यावर जाऊन पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला. यावेळी या परिसराची सफरदेखील भुजबळ यांनी केली. पक्षी निरीक्षण केंद्राकडे जाणारा रस्ता हा दुतर्फा पानकणीस आणि हिरवळ यांनी नटलेला आहे. आजूबाजूला दलदलयुक्त जमीन आणि पाणी आहे. या ठिकाणाहून सफर करताना खूप आनंद मिळतो, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.