जीवदान : पतंगाच्या मांजात अडकलेल्या कावळ्याचा सुटकेसाठी संघर्ष विद्यार्थ्यांनी वाचविले कावळ्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:04 AM2017-11-13T00:04:13+5:302017-11-13T00:10:58+5:30
येथील जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुकलेल्या नीलगिरीच्या वृक्षावर पतंगाच्या मांजात कावळा पंख अडकून लोंबकळत होता.
जळगाव (निं) : येथील जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुकलेल्या नीलगिरीच्या वृक्षावर पतंगाच्या मांजात कावळा पंख अडकून लोंबकळत होता. तेथे दहा ते पंधरा कावळे त्याची सुटका करण्यासाठी घिरट्या घालीत होती. परंतु ते त्याची सुटका करू शकत नव्हते. फक्त आपला जोडीदार संकटात आहे, अत्यवस्थ होऊन विव्हळत आहे, याचे दु:ख त्यांना सतावत होते.
मांजराच्या खेळात उंदराचा जीव जातो या उक्तीप्रमाणे माणसाच्या खेळात बिचाºया कित्येक पशु-पक्ष्यांचे जीव या पतंगाच्या मांजामुळे गेल्याचे आपण पाहतो व ऐकतो. पण याला जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी अक्षय कोरे, अनिल केदारे व मेघराज पोमनर हे अपवाद ठरले. अगदी सुकून पडायला आलेल्या ६० फूट उंच नीलगिरी वृक्षावरचा हा प्रकार पाहून बारावीचे विद्यार्थी मदतीसाठी धावून गेले. पण मोडकळीस आलेल्या वृक्षावर ते चढू शकत नव्हते व झाड खूप उंच असल्याने हात पुरवणेही अशक्य होते. अशातच काही विद्यार्थ्यांनी शक्कल लढवत दोन बांबू एकत्र बांधून त्यावर आकडा तयार केला व तरीही हात पुरेना मग बाजूच्या निंबाच्या झाडावर चढून कुशलतेने त्याच्या पंखात अडकलेला मांजा दूर केल्यानंतर त्या कावळ्याने मुक्तपणे गगनभरारी घेऊन झाडावर बसून जीवदान देणाºयाकडे बघून कृतज्ञता व्यक्त केली. पितृपक्षात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कावळ्याची मानवनिर्मित सापळ्यात अडकून होणाºया मृत्यूंची संख्याही चिंतेची बाब आहे. यासाठी आपण कर्तव्य म्हणून पशु-पक्ष्यांवर होणाºया अत्याचाराविरुद्ध लढा उभारला पाहिजे. याप्रसंगी जीवायपीच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेली भूतदया कौतुकास्पद आहे. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थांसह शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.