येशू जन्म गौरव प्रार्थनेने गजबजले चर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:05 AM2018-12-25T01:05:32+5:302018-12-25T01:06:21+5:30
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते.
नाशिक : प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते. आकर्षक सजावट व रोषणाईने चर्चचा परिसर उजळून निघाला होता. ख्रिसमसचा सण शहरात ख्रिस्ती समाजबांधवांकडून उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावटीने शहरांमधील चर्चचे रूप पालटले आहे.
होली क्रॉस चर्चमध्ये सोमवारी (दि.२४) रात्री नऊ वाजता धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. फादर लॉईड, वेन्सी डिमेलो यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ गीतांचा (कॅरोल) कार्यक्रम पार पडला. यानंतर प्रभू येशूचा जन्म सोहळा द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थना मराठी आणि इंग्रजी भाषेतून पठण करण्यात आली. तसेच मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम सकाळपासून सुरू होणार असल्याची माहिती डिमेलो यांनी दिली. बाळ येशूच्या दर्शनासाठी दिवसभर चर्च खुले राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संध्याकाळी सर्वधर्मीयांसोबत नाताळ सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, संत आंद्रिया चर्चमध्ये धर्मगुरू रेव्हरन्ट अनंत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ‘मिस्सा’ पठण करण्यासाठी समाजबांधवांची रात्री दहा वाजता चर्चमध्ये गर्दी लोटली होती. समाजबांधवांनी सामूहिकरीत्या प्रभू येशूची उपासना करत जन्मोत्सव साजरा केला. तसेच शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये फादर अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. चर्चमध्ये संध्याकाळी धार्मिक प्रार्थना व भक्तीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्च परिसरात आकर्षक प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसराचे रूपडे पालटले होते.
होली होली लॉर्ड गॉड...
होली होली लॉर्ड गॉड..., जगपापहारका परमेश कोंकरा, सोडी दयाधारा आम्हावरी प्रभूवरा..., तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार.., बेथलेहम शहरी, दाविद नगरी जन्मास आले येशू बाळ... अशा विविध नाताळ गीतांनी (कॅरोल) होली क्रॉस चर्च दुमदुमले होते. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून नाताळ गीतांचे गायन केले. तसेच सामूहिक प्रार्थना करत
एकमेकांना येशू जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.