काजी गढीवरील रहिवाशांना चुंचाळेत घरकुले देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:11 AM2019-07-09T01:11:44+5:302019-07-09T01:12:02+5:30
काजी गढीवासीयांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने आता त्यांना चुुंचाळे येथील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
नाशिक : काजी गढीवासीयांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने आता त्यांना चुुंचाळे येथील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. सोमवारी (दि.८) आमदार फरांदे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी गढीची मालकी खासगी नसून शासनाकडेच असल्याचा दावा फरांदे यांनी केल्यानंतर घरकुल योजनेतील रिक्त अथवा वितरित होऊनही ती लाभार्थींनी घेतली नसतील तर अशी घरे देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.
जुन्या नाशिकमधील गावठाण भागातील काजीची गढी धोकादायक असून, रहिवासी येथे जीव मुठीत धरून राहात असल्याने त्यांना स्थलांतरित करण्याचे दर पावसाळ्यात प्रयत्न होत असतात. यंदाही गढीचा काही भाग ढासळल्याने स्थलांतरासाठी प्रशासनाने रहिवाशांवर दबाव वाढविला होता. पोलीस खात्याच्या मदतीने ५९ कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तथापि, कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रामुख्याने अडून असल्याने सोमवारी (दि.८) यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे बैठक झाली. आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील तसेच गढीवरील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी फरांदे यांनी केली. गढीवर अनेक वर्षांपासून संबंधित वास्तव्यास असून त्यामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किंवा म्हाडाच्या घरकुल योजनेचा लाभ देणे शक्य आहे का, याबाबत चर्चा करण्यात आली.
घरकुल योजनेअंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात काजी गढीवरील रहिवाशांनीदेखील अर्ज भरले आहेत. काजी गढीवासीयांना घरकुलांचा लाभ देण्याची मागणी फरांदे यांनी केली. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांना लाभ देता येईल, असे आयुक्त गमे यांनी यावेळी दिले.
रहिवासी स्थलांतरित होणार?
महापालिकेची चुंचाळे येथील घरकुल योजना अंबड परिसरात आहे. जुन्या नाशिकसारख्या भागात रोजीरोटी असलेल्या भागातून रहिवासी स्थलांतरित होतील काय? असा प्रश्न आहे. अर्थात, निलगिरी बागेचा पर्याय मान्य होण्याची शक्यता आहे. चुंचाळेच्या तुलनेत हा भाग जवळ असल्याने त्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.