विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 11:43 PM2021-12-11T23:43:41+5:302021-12-12T00:10:12+5:30
चांदोरी : येथील सुकेणा रस्त्यावरील गायखे वस्ती येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवनदान देण्यास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.
चांदोरी : येथील सुकेणा रस्त्यावरील गायखे वस्ती येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवनदान देण्यास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सुकेना रस्त्यावरील गायखे वस्ती येथे हिरामण बापू गायखे यांची गाय विहिरीत पडली होती. शनिवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गाय शेडमधून दूध काढण्यासाठी सोडली होती. मात्र चारा खाण्यासाठी गेली असता घरासमोर असलेल्या विहिरीत पडली. अमोल हिरामण गायखे यांना गाय विहिरीत पडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीसपाटील अनिल गडाख व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना कळवले. घटनास्थळी टीम दाखल होताच प्रथम त्यांनी बाज बांधून विहिरीत सोडली व गायीला पाण्यात आधार दिला. त्यानंतर वैभव जमधडे, बाळू आंबेकर या स्वयंसेवकांनी विहिरीत उतरून दोर बांधून तिला बुडण्यापासून वाचविले. क्रेनच्या मदतीने गायीच्या पोटाला दोर अडकवून गाईला बाहेर काढण्यात आले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना गायीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.
समितीचे सदस्य पशुचिकित्सक डॉ. संजय भोज यांनी गायीची तपासणी करून उपचार सुरू केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे वैभव जमधडे, बाळू आंबेकर, सागर गडाख, पुष्कर भन्साळी, राजेंद्र टर्ले, सूरज पगारे, सचिन कांबळे, सुभाष फुलारे, संकेत वनारसे, विलास गडाख, पोलीसपाटील अनिल गडाख व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले.