मुंडेंना पुरस्कार दिल्याने व्याख्यानांचे अनुदान रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:12 AM2019-03-06T05:12:23+5:302019-03-06T05:12:32+5:30
सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे.
नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे. महापालिका भाजपाच्या ताब्यात असून याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने १६ वर्षांपासून कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ नेर्लीकर दांपत्य यांच्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण होते.
यावर्षी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र मुंडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता, असा खेद वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी जाहीर समारंभातच व्यक्त केला.
वाचनालयाचे कार्यवाह असलेले श्रीकांत बेणी हे वसंत व्याख्यानमालेचेही अध्यक्ष असल्याने व्याख्यानमालेचे अनुदान देऊ नये, यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. या संदर्भात बेणी यांनी आयुक्तांना पत्र दिले असून
अनुदान रोखणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
>यंदा धनंजय मुंडे यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर झाल्यानंतर हा पुरस्कार रद्द करावा, यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींकडून दबाव आणला गेला, परंतु पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र समिती असून, त्या समितीचा हा निर्णय असल्याने कार्यकारी मंडळाने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- श्रीकांत बेणी, कार्यवाह, सार्वजनिक वाचनालय.