गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट
By admin | Published: September 2, 2016 10:51 PM2016-09-02T22:51:03+5:302016-09-02T22:51:48+5:30
गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट
सटाणा : तालुक्यातील चौगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या टमाटा वाणाची लागवड करून गळून पडलेली कच्ची-पक्की फळे थेट ट्रॉली भरून तहसील कार्यालयात आणून टाकत गांधीगिरी केली. तहसीलदारांना टमाटे दाखवित संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
लाखो रु पये खर्च करून हातातोंडाशी आलेले पीक केवळ बोगस वाणाच्या बियाणांमुळे वाया गेल्याने शेतकरी आक्र मक झाले. सदर कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
बियाणे लावून रोपे तयार करण्यापासून तर विविध औषधे व खते तसेच टमाटा झाड बांधणीसाठी असा लाखो रु पयांचा शेतक ऱ्यांनी खर्च करून बाग फुलवली. मात्र दोन ते अडीच महिन्यातच टमाटा फळांची अचानक गळती सुरू झाली असून, अनेक बागांमधील झाडांवरील सर्व फळे गळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आज गळती झालेला टमाटा थेट तहसील कार्यालयात आणून संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनावर काका रौंदळ, काशीनाथ मांडवडे, दीपक गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, संजय शेवाळे, कृष्णा शेवाळे, नारायण शेवाळे, रामदास शेवाळे, दीपक शेवाळे, नितीन शेवाळे, नानाजी शेवाळे, मोठाभाऊ शेवाळे, केदा शेवाळे, लोटन शेवाळे, केवळ गांगुर्डे, राकेश मांडवडे, कैलास गांगुर्डे आदिंसह शेकडो टमाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.