बालकुमार साहित्य संमेलनाचा पहिला मान लाभण्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:32 PM2021-02-24T23:32:37+5:302021-02-25T01:32:24+5:30
नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.
नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.
ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले.
९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत बाल मेळाव्याबाबतीत नाशिकचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध असून, शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपासनी यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर वैशाली झनकर-वीर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, नीलेश पाटोळे, उपशिक्षणाधिकारी ए. एम. बागुल, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक संस्था व शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक भेटी व सहली यांचे आयोजन करतात, त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम आवश्यक असल्याचे वैशाली झनकर-वीर यांनी सांगितले. बालकुमार मेळावा प्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रास्ताविकातून बाल मेळाव्याची माहिती दिली.
संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांनी आभार मानले. या बैठकीत रंजन ठाकरे, स्वप्नील पाटील, गीता बागुल, सविता कुशारे, अभिजीत साबळे आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.