व्यावसायिकांवरही येणार गंडांतर
By संजय पाठक | Published: July 13, 2019 01:10 AM2019-07-13T01:10:44+5:302019-07-13T01:11:16+5:30
शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करताना दुसरीकडे मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्यांना मात्र नाहक स्मार्ट पार्किंगच्या शुल्कापोटी दंड भरावा लागणार आहे.
नाशिक : शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करताना दुसरीकडे मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्यांना मात्र नाहक स्मार्ट पार्किंगच्या शुल्कापोटी दंड भरावा लागणार आहे. त्यातच अनेक ठिकाणी तर सशुल्क पार्किंगमुळे तर ग्राहक अशा दुकानदारांकडे पाठ फिरवेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील १३ ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र असे करताना कंपनीने केवळ मोबीलीटी सेलच्या माध्यमातून पोलिसांना जागा दाखवून ना हरकत दाखला घेतला आहे. प्रत्यक्षात त्यामुळे काय अडचणी येतील हे कंपनीने ना पोलिसांनी तपासले आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारची कार्यवाही करताना कंपनीने अशा जागांना प्रथम महापालिकेच्या नगररचना विभागाकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक होते तसे न केल्याने अनेक ठिकाणी दुकाने किंवा व्यापारी संकुलांसमोरच स्मार्ट पार्किंग थाटली आहेत. या दुकानांचे फ्रंट मार्जीनवर त्यामुळे गंडांतर आले आहे, ते कायद्याला कितपत धरून आहे, हादेखील प्रश्न आहे. कोणत्याही मिश्र किंवा व्यापारी संकुलातील दुकानांसाठी त्याच्या दुकानासमोरील जागा वाहनतळासाठीच ठेवावी लागते.
नागरिकांना भुर्दंड, कंपनीचा वाढणार धंदा
स्मार्ट सिटी कंपनीने अनेक चुकीच्या जागा निवडल्याचे दिसत असून, आता व्यावसायिकदेखील त्यास विरोध करू लागले आहेत. पंचवटी कारंजा येथे रस्त्यावर प्रस्तावित स्मार्ट पार्किंगला विरोध झाला. अर्थात, त्यानंतरही कंपनीने अनेक रहदारी किंवा जेथे लोकांना विविध कामांसाठी जावे लागते, अशा ठिकाणांची निवड केली असून, त्यामुळेदेखील नागरिकांना भुर्दंड बसणार आहे. नेहरू उद्यानाच्या समोर नामको बॅँक आहे किंवा खडकाळी सिग्नलजवळ जिल्हा परिषदेच्या बाहेर वाहनांची गर्दी असते. तेच स्मार्ट पार्किंग सुरू केल्याने कंपनीचा धंदा वाढणार आहे.