कारची काच फोडली अन् दोन लाखांची रोकड लांबविली; भरदिवसा घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 01:02 PM2020-10-22T13:02:47+5:302020-10-22T13:03:15+5:30
नाशिक : शहर परिसरात लुटीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसताना सातत्याने वाहनांमधून मौल्यवान ...
नाशिक : शहर परिसरात लुटीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसताना सातत्याने वाहनांमधून मौल्यवान वस्तूंसह रोकड असलेल्या बॅग चोरट्यांकडून भरदिवसा लंपास केल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. कॅनडाकॉर्नरवर बुधवारी (दि.२१) अशाचप्रकारे एका व्यावसायिकाच्या कारच्या खिडकीची काच फोडून अज्ञात चाेरट्याने २ लाख १६ हजारांची रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहर व परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये अनलॉक होताच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सोनसाखळी चोरी, घरफोडी, मोबाइल चोरी, वाहनचोरी, बॅग लिफ्टिंगसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. पाथर्डीफाटा येथील रहिवासी असलेले प्रसाद अरुण सोनार हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मोबाइल शॉपीवर आले. त्यांनी आपली चारचाकी दुकानाजवळ उभी केली. यावेळी बँकेत भरण्यासाठी आणलेली रोकड असलेली बॅग कारमध्ये ठेवून कार लॉक करत दुकानात गेले.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते बँकेत जाण्यासाठी कारजवळ आले असता कारच्या खिडकीची काच फोडलेली त्यांना दिसली. त्यांनी घाईघाईने कारमध्ये ठेवलेली बॅग तपासली असता ती आढळून आली नाही. तसेच आयफोन मोबाइल, पासपोर्ट आदी महत्त्वाच्या कागदपत्रांचाही अपहार करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत त्वरित सोनार यांनी पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी याबाबत जवळचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.