सातपूर भागात मद्यपीने फोडली नव्या कोऱ्या बसची काच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:29+5:302021-07-24T04:11:29+5:30
नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बससेवा सुरू होऊन महिनाही पूर्ण होत तोच नव्या कोऱ्या बसला टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागू ...
नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बससेवा सुरू होऊन महिनाही पूर्ण होत तोच नव्या कोऱ्या बसला टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागू लागले आहे. श्रमिकनगर बस थांब्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक एमएच १५ जीव्ही ७९३९ तपोवन ते श्रमिकनगर ही बस थांबली होती. बसचालकाने नेहमीप्रमाणे प्रवासी भरण्यासाठी दरवाजा उघडला असता परिसरातील एक टवाळखोर मद्यपान करून बसमध्ये चढला. बस लवकर चालव म्हणून वाहनचालकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चालकाने दुर्लक्ष केले म्हणून मद्यपीने आतूनच बसच्या काचेवर दगड फेकून काच फोडली. चालकाने खाली उतरून झालेले नुकसान पाहत असताना चालकालाही दगड मारून जखमी केले. या दगडफेकीत बस चालकाच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. मद्यपीचा उपद्रव सुरूच असताना त्याचे मित्रही या ठिकाणी आले. त्यांनीही चालकाला मारहाण केली. या घटनेनंतर टवाळखोरांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान व वाहनचालकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात टवाळखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.