७४ कोटींच्या कामांतून ११८ गावांत स्वच्छ भारतची झलक
By धनंजय रिसोडकर | Published: November 21, 2023 06:11 PM2023-11-21T18:11:23+5:302023-11-21T18:11:50+5:30
या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे
धनंजय रिसोडकर, नाशिक: जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील काही गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून गावांचा कायापालट करण्याचा प्रयास केला जाणार आहे. जिल्ह्यातील ५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११८ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. त्यासाठी ७४.११ कोटींच्या कामांचे विकास आराखडे तयार झाले आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदेला निधी आला आहे. या टप्प्यात सुरुवातीला ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११८ गावांच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या ७४ कोटींच्या कामांचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या गावांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते.
या गावांमधील कामाचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत पाच हजारांखालील लोकसंख्या असलेल्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६०, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ५ हजारांवरील लोकसंख्येच्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये; तर सांडपाण्यासाठी ६६० रुपयांप्रमाणे निधी दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या कामांचे विकास आराखडे तयार करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.