गुन्हेगारांच्या टोळक्याचा प्रताप; गांधी तलावातील चार बोटी पेटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:31 PM2021-03-24T14:31:16+5:302021-03-24T14:33:38+5:30
मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पंचवटी : गोदावरीचा प्रवाह सध्या खळाळत नसल्याने अहल्यादेवी होळकर पुलापासून रामकुंडापर्यंत गांधी तलाव कोरडेठाक झाले आहे. त्यामुळे येथील बोटिंग क्लब चालविणाऱ्या ठेकेदारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या चार बोटी देवमामलेदार मंदिराजवळ काठवर उभ्या करुन ठेवलेल्या असताना बुधवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास अज्ञात गुंडांच्या टोळक्याने या बोटींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला.
मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने केलेल्या या जाळपोळीत चारही बोटी जळून राख झाल्या आहेत. सकाळी जेव्हा हा प्रकार पंचवटी पोलिसांना समजला तेव्हा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जाळलेल्या बोटींची पाहणी केली. याप्रकरणी दुपारी उशीरापर्यंत कोणीही तक्रार नोंदविण्यासाठी
पुढे आले नव्हते असे पोलिसांनी सांगितले.या जाळपोळीमागे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पूर्ववैमनस्यातून चारही बोटी जाळल्याची गोदाकाठावर चर्चा आहे.
रामकुंड हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून शेकडो भाविक देवदर्शनासाठी गंगाघाटावर दररोज येतात. नदीपात्रात असलेल्या वाहत्या पाण्यात बोटींच्या माध्यमातून पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेत असतात. याबाबत महापालिकेने ए्का ठेकेदाराला ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत कामे गोदाकाठालगत सुरू असल्याने नौकाविहार बंद करण्यात आले आहे. ठेकेदाराने त्याच्या ताब्यातील त्या चार बोटी गांधी तलावात कोपऱ्यात उभ्या करून ठेवल्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञातांनी गांधी तलावात येऊन उभ्या चार बोटींना आग लावून त्या पेटवून दिल्या. बोटीला लाकुड आणि प्लॅस्टिक वापरलेले असल्याने काही वेळातच या बोटींचा जळून कोळसा झाला याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.