भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:30 AM2019-07-27T00:30:19+5:302019-07-27T00:30:48+5:30
भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी कारिगल विजय दिवस आपण अभिमानाची बाब म्हणून आणि आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नसून तो भारतीय सैन्याचा गौरव आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनिरुद्ध पद्माकर देव यांनी केले.
नाशिक : भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी कारिगल विजय दिवस आपण अभिमानाची बाब म्हणून आणि आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नसून तो भारतीय सैन्याचा गौरव आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनिरुद्ध पद्माकर देव यांनी केले.
कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने पोलीस परेड पटांगण ते भोसला स्कूल पर्यंत शुक्रवारी (दि.२६) पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, सहकार्यवाह नितीन गर्गे, संस्थेचे कोषप्रमुख मनोहर नेवे, आशुतोष रहाळकर, शीतल देशपांडे, भोसला मिलिटरी कमांडट विंग कमांडर, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स कमांडट व्ही. सी. मथाई, मुख्याध्यापक डॉ. अंजली सक्सेना, भोसला मिलिटरी कॉलेज प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. प्रीती कुलकर्णी, बालक मंदिर मराठी मुख्याध्यापक नीता पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड पटांगण येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यानंतर तीनही पथक भोसला मिलिटरी स्कूल शहीद स्मारकापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी पथसंचलनाने एकत्र आलेल्या २,२२५ विद्यार्थ्यांनी स्कूलमधील शहीद स्मारकास मानवंदना अर्पण केली. तसेच सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे ब्रिगेडियर अनिरुद्ध पद्माकर देव, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे यांनीही याठिकाणी मानवंदना दिली.
पथ संचलनाने वातावरण भारावले
या संचलन कार्यक्रमासाठी भोसला मिलिटरी स्कूलचे ६५० विद्यार्थी, २५७ विद्यार्थिनी आणि भोसला मिलिटरी कॉलेजचे ५०० विद्यार्थी आणि रामदंडी सैनिकी प्रशिक्षणातील शाळांचे ४०० विद्यार्थ्यांचे शहरातील तीन ठिकाणांहून निघालेल्या पथ संचलनात आज वातावरण देशभक्तीने भारावलेले होते. यात १३ जणांचे अश्वपथक आणि ७५ विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद यांचाही समावेश होता. भोसला स्कूलचे संचलन कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी चौकात, मिलिटरी कॉलेजचे संचलन गंगापूररोडवरील पोलीस हुतात्मा स्मारक व मिलिटरी स्कूल गर्ल्सचे संचलन पारिजातनगर, बसस्थानक चौकात सादर झाले.