गुन्ह्यांचा उत्कृष्ट शोध घेणाऱ्या पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:17 AM2021-05-25T04:17:17+5:302021-05-25T04:17:17+5:30
नाशिक : शहरातील विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा कौशल्याने तपास करत छडा लावल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1, युनिट-2 आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे ...
नाशिक : शहरातील विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा कौशल्याने तपास करत छडा लावल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1, युनिट-2 आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह देऊन सोमवारी (दि.24) गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे दीपक पाण्डेय यांनी हाती घेतल्यापासून शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगार, टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्याचे त्यांनी ‘लक्ष्य’ ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी गुन्हे शाखांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांच्या तपासाची स्थिती जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. जानेवारीपासून आतापर्यंत उपनगर, नाशिक रोड, भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चार गुन्ह्यांमधील ८१ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-1च्या पथकाने पाच महिन्यांत ५१ गुन्हे उघडकीस आणत २६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काही दिवसांपूर्वी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत विदेशी मद्याचे गोदाम लुटणाऱ्या संशयित आरोपींना परजिल्ह्यात जाऊन शिताफीने सापळा रचून गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी कोणताही पुरावा नसताना आरोपींना बिहार राज्यात जाऊन अटक केली. त्यानिमित पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, अजय शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांना गौरविण्यात आले.