वैशाली झनकर यांच्या वहिनींचेही प्रताप उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:17+5:302021-08-25T04:20:17+5:30
मुरंबी प्राथमिक शाळेसाठी शिक्षकांची दोन पदे मंजूर आहेत. त्यातील उशीर या गेल्या दोन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे एकच शिक्षक शाळेवर ...
मुरंबी प्राथमिक शाळेसाठी शिक्षकांची दोन पदे मंजूर आहेत. त्यातील उशीर या गेल्या दोन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे एकच शिक्षक शाळेवर काम करीत असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समितीचे गायकवाड व हिरामण राऊत यांनी त्र्यंबकेश्वर गट विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. शाळेला शिक्षक न मिळाल्यास १२ ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच मुरंबी शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली असता, त्यात तथ्य आढळून आले. शिक्षिका उशीर या फक्त एकच दिवस शाळेत हजर राहिल्याचे चौकशीत उघड झाले असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावरील लाच प्रकरण घडण्यापूर्वीच उशीर या पुन्हा मुरंबीच्या शाळेत हजर झाल्या व त्यांनी पुन्हा रजेवर जाणार असल्याचे सांगितल्याचे विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले असले, तरी दरम्यानच्या काळात झनकर या स्वत:च लाच प्रकरणात अडकल्याने शिक्षिका उशीर यांनी १७ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना भविष्यात कोठेही बदलून वा रजेवर जाणार नसल्याचे लिहून दिले.
चौकट===
सारेच काही संशयास्पद
पेठहून त्र्यंबकेश्वर येथे बदली होताच, उर्मिला उशीर यांची दुसऱ्याच दिवशी नाशिकला प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. गेली दोन वर्षे त्या नाशिकच्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेत कार्यरत होत्या. याच कार्यालयाचे प्रमुख म्हणून काही काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या कार्यरत होत्या. त्यांच्याच कार्यकाळात वहिनी उशीर यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र, त्यांना आदिवासी भागात सेवा बजावल्याबद्दलची वरिष्ठ वेतनश्रेणीही सुरूच ठेवण्यात आली हाेती.