दिवाळी सुटीत गावी जा, पण पाणी साठवू नका
By admin | Published: October 26, 2016 12:18 AM2016-10-26T00:18:27+5:302016-10-26T00:19:35+5:30
आवाहन : डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना
नाशिक : शहरात डेंग्यूने अद्यापही पिच्छा सोडलेला नाही. डेंग्यूची लागण होण्यास कारणीभूत असलेल्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने नागरिकांनी दिवाळी सुटीत बाहेरगावी जाताना घरात पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मागील तीन वर्षांत मनपा कार्यक्षेत्रातील संशयित व डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आढावा घेतला असता नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर संशयित व डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते. सदर रुग्ण आढळलेल्या परिसरातील कारणांचा शोध घेतला असता दिवाळीनिमित्त सुटीत बरेच नागरिक बाहेरगावी जाताना घरातील पाणीसाठे तसेच ठेवून जातात. बरेच दिवस सदर पाणी विनावापर पडून राहत असल्याने स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. परिणामी, परिसरात डेंग्यूच्या आजाराचा फैलाव होतो. त्यामुळे, नागरिकांनी सुटीनिमित्त बाहेरगावी जाताना घरात पाणी साठवून ठेवू नये. गावी जाताना सर्व पाणी ओतून द्यावे व भांडी कोरडी करून ती पालथी मांडून ठेवावीत. जे पाणी साठे नष्ट करता येणे अशक्य आहे अशा पाणीसाठ्याला घट्ट झाकण लावावे अथवा कापडाने झाकण बांधून ठेवावे. जेणेकरून डास अशा पाण्यात अंडी घालणार नाही व रोगाचा प्रसार होणार नाही. नागरिकांनी स्वत:च्या आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सावधानता पाळावी, असे आवाहन डॉ. डेकाटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)