शाळेला चला तुम्ही शाळेला चला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 01:16 AM2022-01-24T01:16:08+5:302022-01-24T01:16:35+5:30
सोमवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ होत आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविणे सक्तीचे नसल्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
नाशिक : सोमवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ होत आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविणे सक्तीचे नसल्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या १० जानेवारी रोजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुलांमध्ये संसर्ग अधिक पसरला नसल्याचा निष्कर्ष काढत जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि.२४) पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण कायम असले तरी, त्यापासून मृत्यूचा धोका कमी झाला आहे. अशा परिस्थितीत शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करताना मुलांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यात बाधित मुलांची संख्या अत्यल्प असल्याने तसेच त्यांच्या उपचारासाठी खाटांची विशेष व्यवस्था असल्यामुळे आरोग्य यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शाळांनीदेखील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच शाळेतील कर्मचारीवर्ग आजारी असल्यास त्यांची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
----इन्फो--
शिक्षक, कर्मचाऱ्यांची तपासणी
शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन डोस झालेले असणे अनिवार्य करण्यात आले आहेच, शिवाय त्यांची आरटीपीसीआर चाचणीदेखील बंधनकारक करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची तपसणी दर ७२ तासांनी करावी लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
--इन्फो--
विद्यार्थी बाधित झाले तर शाळा बंद
एखाद्या शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले तर अशा शाळा तत्काळ बंद करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला दिलेले आहेत. अर्थात मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याने काही पालकांना दिलासादेखील मिळाला आहे.
--इन्फो--
सर्वच शाळा सुरू होणार
खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या सर्वच शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अनेक शाळांनी मुलांचे गट करून त्यांना शाळेत गटागटाने बोलविण्याची तसेच ऑनलाइनचाही तयारी केली आहे.