शंभर दिवसांत १४७ कार्यक्रमांचे लक्ष्य
By admin | Published: August 30, 2016 02:10 AM2016-08-30T02:10:41+5:302016-08-30T02:11:08+5:30
विजया रहाटकर : राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यशाळेत निर्णय
नाशिक : राज्य महिला आयोगातर्फे शंभर दिवसांत १४७ कार्यक्रम घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, राज्यात महिल्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सुजाण समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन केले असल्याचे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.
आयएमए सभागृहात राज्य महिला आयोेग विभागीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, गयाताई कराड,
अ. ना. त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अंकुश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. शोभा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधिक माहिती देताना रहाटकर यांनी सांगितले की, मिशन १४७ अंतर्गत कार्यशाळा, जनजागृतीपर कार्यक्रम यांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या कायद्याबरोबरच मनापासून, कृतीतून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सर्व समुपदेशकांना भर देण्यात येणार आहे.
महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात येणे अडचणीचे ठरत असल्याचे जाणवल्याने आयोगच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाला असून, त्याअंतर्गत आजपर्यंत औरंगाबाद, नांदेड, कोकण, कोल्हापूर, नाशिक येथे दौरे झाले आहेत. केवळ मुंबईचाच दौरा आता शिल्लक असून, महिला आयोगाकडील जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. शोभा शिंदे, अॅड. मीनल कोहर, सोलापूर येथील प्रयास संस्थेच्या देवयानी टुम्मा आदिंनी ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’, ‘महिला विषयक कायदे’, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. गटचर्चेने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)