लक्ष्य : दोडी व दापूरच्या रेशनदुकानदारांचे चोरले रॉकेल
By admin | Published: January 31, 2015 11:34 PM2015-01-31T23:34:31+5:302015-01-31T23:35:54+5:30
‘मोलामहागा’च्या रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला
नांदूरशिंगोटे : संपूर्ण राज्यभरात रॉकेल कपातीचे धोरण राबविण्यात आल्याने शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल ‘महागा’चे बनले आहे. त्यामुळे चोरट्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या रॉकेललाच ‘लक्ष्य’ केले.
सिन्नर तालुक्यातील दोडी व दापूर येथील रेशनच्या रॉकेलवर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे ७०० लिटर रॉकेल चोरून नेल्याची घटना घडली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रॉकेल कपात करण्यात आल्याने रेशनदुकानदारांचा कोठा कमी
झाला आहे. त्यामुळे प्रत्येक शिधापत्रिकेवर केवळ एक लिटर रॉकेल मिळत आहे.
प्रत्येक घरात रॉकेल अत्यावश्यक बाब असल्याने रॉकेलचे महत्त्व वाढले आहे. चोरट्यांनी
दोडी व दापूर येथील रेशन दुकानदारांच्या रॉकेलवर लक्ष्य
ठेवून रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर असणाऱ्या टाक्यांमधून रॉकेल
चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
दोडी खुर्द येथील मोहन विश्वनाथ दिवटे या दुकानदारांकडून शिधापत्रिकेवर रॉकेल विक्री
केली जाते. चोरट्यांनी दिवटे
यांचे ५०० लिटर रॉकेल टाक्यांसह चोरून नेले, तर दापूर येथील
अजित सोमाणी यांचे २१० लिटर रॉकेल टाकीसह चोरट्यांनी चोरून नेले.
सुमारे ११ हजार रुपये किमतीचे सदर रॉकेल चोरीला गेल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. याप्रकरणी दोडी खुर्द व दापूर येथील रेशनदुकानदारांनी वावी पोलीस ठाण्यात रॉकेल चोरीची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)