कारखान्यांमध्ये ‘शून्य अपघात’ ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:04+5:302021-09-07T04:19:04+5:30
उद्योग क्षेत्राच्या विकासात सुरक्षिततेचे नियम हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्यात जागरूकता व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केल्यास अपघातांचे ...
उद्योग क्षेत्राच्या विकासात सुरक्षिततेचे नियम हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्यात जागरूकता व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदतच होईल. उत्पादनाबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेला महत्त्व आवश्यक आहे. कारखान्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग लक्ष ठेवून आहे. या विभागामार्फत जनजागृतीसाठीचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे दुर्दैवाने कारखान्यात अपघात झाल्यास, जीवितहानी अथवा एखाद्या कामगाराला अपंगत्व आल्यास त्या कामगाराला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. मयत कामगाराच्या वारसास आर्थिक मदत, सानुग्रह अनुदान आणि नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. कायद्याचे उल्लंघन आणि हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास कारखाना मालकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल केला जातो.
प्रत्येक कारखान्यात कारखाना अधिनियम १९४८ व महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार नियमप्रमाणे सुरक्षा साधने, आग विरोधक यंत्रणा, फायर हैड्रन्ट, फायर बकेट, फायर फायटिंग यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. नियमाप्रमाणे कामगारांना, सुरक्षा रक्षकांना, व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते. धोकादायक आणि रासायनिक उद्योगांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असते. कारखान्यात गंभीर अपघात झाल्यास त्याची माहिती विहित नमुन्यात व वेळेत संचालनालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, तर अपघाताची माहिती लपविणे गुन्हा समजला जातो. पूर्वी पॉवरप्रेस मशीनवर अपघातांचे प्रमाण खूप होते. कामगारांना प्रशिक्षित करून, तसेच त्यात ऑटोमेशन आणल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. रासायनिक आणि अतिधोकादायक कारखान्यात
वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन, प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मागील वर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
-एम. आर. पाटील, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा नाशिक विभाग
(फोटो ०५ पाटील)