बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा पिलासह मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:56+5:302021-07-11T04:11:56+5:30

तालुक्यातील भोजापूर खोरे परिसर तसेच दापूर भागातील चापडगाव शिवार या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला ...

Goat dies in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा पिलासह मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा पिलासह मृत्यू

Next

तालुक्यातील भोजापूर खोरे परिसर तसेच दापूर भागातील चापडगाव शिवार या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला असून बिबट्याच्या मुक्तसंचाराने दहशत निर्माण झाली आहे. गत आठवड्यात चापडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याने निवृत्ती सांगळे यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. सदरची घटना ताजी असतानाच भोजापूर खोऱ्यात बिबट्याने शेळीवर हल्ला चढविला आहे. नळवाडी शिवारातील चिंचबनवाडी रस्त्यालगत राहणाऱ्या विजय बापू सहाणे हे गट नंबर ३ मध्ये वास्तव्य करतात. सहाणे यांच्या वस्तीजवळच शेळ्यांचा गोठा आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यावर हल्ला चढवत शेळी व बकरीचा फडशा पाडला. बिबट्याने गोठ्याची लोखंडी जाळी वाकवून आत प्रवेश करत शेळ्यांना लक्ष्य केले. यावेळी गोठ्यातील अन्य शेळ्यांनी आरडाओरडा केल्याने सहाणे कुटुंबीयांना जाग आली. त्यानंतर बिबट्या पसार झाला. घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शेळी व बकरू ठार झाल्याने सहाणे यांचे तीस हजार रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाले आहे.

चौकट :

बिबट्याचा मुक्तसंचार

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी तसेच दापूर परिसरातील चापडगाव, धुळवड, पिंपळे आदी परिसर डोंगराळ असल्याने बिबट्याला लपण्यासाठी मोठा भाग आहे. दोन्ही परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीवर तसेच पाणवठ्यावर बिबट्याचे दर्शन होत असते. बिबट्याने अनेकदा मनुष्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Goat dies in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.