बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:14 PM2019-08-09T23:14:45+5:302019-08-10T00:20:51+5:30
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे ग्रामपंचायतीच्या गायरानात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात यमुना नवाळे यांची शेळी ठार झाली.
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे ग्रामपंचायतीच्या गायरानात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात यमुना नवाळे यांची शेळी ठार झाली.
संजय लहामटे, निवृत्ती हगवणे, यमुना काळे यांचा जवळपास ५० शेळ्यांचा कळप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरानानील गट क्र. १४/१५ मध्ये चरत होत्या. जवळच असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. ही बाब गुराख्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत धाव घेतली. त्यामुळे एका शेळीवर हल्ला करून बिबट्याने जंगलात धूम ठोकली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने शेळीचा मृत्यू झाला. यमुना नवाळे यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.
गुराख्यांनी सरपंच रमेश हगवणे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले. कोनांबेचे परिमंडळ अधिकारी पंडित आगळे, शिपाई बाबुराव सदगीर, रामेश्वर माळी आदींसह पशुवैद्यक डॉ. विश्वास वल्टे, डॉ. जालिंदर लहामटे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पशुपालक नवाळे यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे आगळे यांनी सांगितले.