बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By admin | Published: October 2, 2016 11:10 PM2016-10-02T23:10:32+5:302016-10-02T23:11:03+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. भरदिवसा बिबट्या दृष्टीस पडत असल्याने त्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
ठाणगाव शिवारातल्या केदरदेव परिसरातील भिका गेणू शिंदे यांनी शेतात चरण्यासाठी गाभण असलेली शेळी बांधली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जवळच वाढलेल्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. शेळीच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावले.
तथापि, तोपर्यंत बिबट्याने शेळीची मान जखमी केल्याने ती मृत झाली होती. या घटनेमुळे शिंदे यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनपाल डी. व्ही. तुपलोंढे, प्रशांत दांडगे, वनरक्षक टी. ई. भुजबळ, शंकर शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळीचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)