पाथरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:46+5:302021-02-10T04:14:46+5:30
पाथरे : तालुक्यातील पाथरे येथील उजव्या कालव्याजवळील हागोटे वस्ती, चिने वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी मृत्युमुखी पडली. सोमवारी रात्री ...
पाथरे : तालुक्यातील पाथरे येथील उजव्या कालव्याजवळील हागोटे वस्ती, चिने वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी मृत्युमुखी पडली.
सोमवारी रात्री आठच्या दरम्यान दत्तात्रय हागोटे यांच्या वस्तीवर बिबट्या आला होता. हागोटे यांच्या गायी, शेळ्या बाहेर होत्या. त्यातील एका शेळीवर बिबट्याने आक्रमण केले. त्यात ती मृत्युमुखी पडली. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे हागोटे यांना काहीतरी घडल्याचे समजताच त्यांनी लपून बसलेला बिबट्या विजेरीच्या उजेडात बघितला. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याबद्दल कल्पना दिली. हागोटे यांची शेळी फस्त करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याच्या हल्ल्यात शेळी मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची महिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून घेऊन अरुण हागोटे यांच्या डाळिंबाच्या बागेत पिंजरा लावला आहे. काही दिवसांपासून पाथरे परिसरात बिबट्या व दोन बछडे यांचे वास्तव्य आहे. हागोटे यांच्या वस्तीजवळ, वारेगावच्या परिसरात हा बिबट्या रात्रीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना दिसला होता. या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी भरावे लागते. आता मात्र बिबट्याच्या अस्तित्वामुळे शेतकरी रात्री-अपरात्री बाहेर पडणे टाळत आहेत. बिबट्या दिसलेल्या वस्तीजवळ किंवा शेताजवळ सावध राहून काम करावे. जनावरांच्या गोठ्याभोवती शेकोटी करणे, मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, मिरचीचा धूर करणे असे केल्याने बिबट्या जवळ येणार नाही असे वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. सरोदे, वनरक्षक के. आर. वीरकर, ए. टी. रुपवते, आर. जी. गवळी, वनसेवक नारायण वैद्य आदींनी शेतकऱ्यांना सांगितले.
===Photopath===
090221\09nsk_21_09022021_13.jpg
===Caption===
पाथरे येथे अरुण हागोटे यांच्या शेतात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावतांना वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी पी.ए.सरोदे, वनरक्षक के.आर.वीरकर, ए.टी. रुपवते, आर. जी.गवळी, वनसेवक नारायण वैद्य व शेतकरी