टेंभूरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM2016-10-26T23:08:36+5:302016-10-26T23:08:37+5:30
टेंभूरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. येथून जवळच असलेल्या टेंभूरवाडी येथील नामदेव त्र्यंबक पाटोळे यांच्या घराबाहेर शेळी बांधलेली होती. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास या शेळीवर हल्ला केला. शेळीने जीव वाचवण्यासाठी दोरी तोडली. मात्र, बिबट्याने तिच्यावर झडप घातली. शेळीच्या ओरडण्याने पाटोळे कुटुंबीय बाहेर आले तेव्हा बिबट्या शेळीचा फडशा पाडत असल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्याने शेळीला ठार केल्याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांसाठी परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे असून, परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)