देवही असुरक्षित; चोरट्यांचा आता मंदिरांवर डोळा

By admin | Published: November 23, 2015 12:08 AM2015-11-23T00:08:51+5:302015-11-23T00:09:06+5:30

चोरट्यांचा धोका : शहरातील विविध मंदिरांत दोन दिवसांत तीन घटना

God is insecure; Now the eyes of the thieves of the thieves | देवही असुरक्षित; चोरट्यांचा आता मंदिरांवर डोळा

देवही असुरक्षित; चोरट्यांचा आता मंदिरांवर डोळा

Next

नाशिक : कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये पौराणिक काळातील मंदिरे असून या मंदिरांना चोरट्यांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या घरांबरोबरच देव-देवतांची घरेही चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरून ही बाब स्पष्ट होत असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक ‘दक्ष’ राहण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
शहरात चोरट्यांकडून नागरिकांच्या घरांबरोबरच देवांची घरेही ‘टार्गेट’ केली जात असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाचा धाकच राहिला नसल्याचे विविध घटनांमधून प्रकर्षाने जाणवत आहे. पंचवटी, आडगाव, गंगापूररोड, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर अशा सर्वच भागांमध्ये घरफोड्यांसह मंदिरांमधील लुटीच्या घटना सातत्याने घडत असूनदेखील चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास रामकुंडावरील पुरोहित संघाचे अतिप्राचिन गंगागोदावरी मंदिराला चोरट्यांनी लक्ष्य केले. या मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील सोन्याच्या दागदागिन्यांसह पूजेचे साहित्य ओरबाडत दोन्ही दानपेट्याही फोडल्या आणि त्यामधील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने टाकलेले ‘दान’ रोख रक्कमही हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याचवेळी शेजारी असलेले स्वयंभू बाणेश्वर मंदिराचेही चोरट्यांनी कुलूप तोडून दानपेटीमधील रक्कम पळविली. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या कपालेश्वर पोलीस चौकीमधील एकाही कर्मचाऱ्याला किंवा पंचवटीच्या गस्त पथकाला याबाबत सुगावा लागला नाही हे विशेष! ही घटना ताजी असताना आडगावच्या ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीची मूर्तीही चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरून नेण्याचा प्रताप केला. पंधरवड्यापूर्वीच श्रीकृष्णनगरमधील कृष्णमंदिराची दानपेटीही चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले होते. पाइपलाइनरोडवरील दोन मंदिरेही चोरट्यांनी दहा दिवसांपूर्वी लक्ष्य केली होती. या गुन्ह्यांमधील संशयित शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: God is insecure; Now the eyes of the thieves of the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.