देव माझा विठू सावळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:02 AM2019-07-13T01:02:07+5:302019-07-13T01:03:17+5:30
भावभक्तीत तल्लीन होऊन भाविक विठू चरणी लीन झाले होते. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर विठ्ठलाच्या भक्तीचा सोहळा सुरू होता.
नाशिक : देव माझा विठू सावळा,
माळ त्याची माझिया गळा....
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठचे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा....
अशा भावभक्तीत तल्लीन होऊन भाविक विठू चरणी लीन झाले होते. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर विठ्ठलाच्या भक्तीचा सोहळा सुरू होता. पहाटेपासूनच मंदिरांमधील घंटानाद आणि मंत्रघोषाने आषाढी एकादशीची पहाट उगवली. भावभक्तिगीते आणि भजनात तल्लीन झालेल्या भाविकांनी विठूरायाचे नामस्मरण करीत दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. शहरातील कापड बाजार, काझीपुरा, कॉलेजरोडवरील नामदेव विठ्ठल मंदिर, वडाळारोडवरील मंदिर, देवळाली गाव तसेच विहितगाव, पंचवटी आदी परिसरातील मंदिरांमध्ये विठू माउलीचे साजिरे सुंदर रूप सजले होते.
आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी सजविलेले प्रवेशद्वार, भक्तिगीतांचे सूर आणि भाविकांच्या गर्दीने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शहर परिसर तसेच उपनगरांमध्येही विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिरात रांगेत जाण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते, तर काही मंदिरांच्या परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. भाविकांना सावध राहण्याच्या सूचना तसेच महिलांना दागिने सांभाळाच्या सूचना पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून देण्यात येत होत्या. उपवासाच्या पदार्थ्यांचा प्रसाद भाविकांना दिला जात होता. काही मंदिरांमध्येच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
उपवासाची खिचडी आणि लाडू
आषाढीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे आज सर्वत्र उपवासाच्या पदार्थांचेच स्टॉल्स दिसत होते. सकाळी विविध पदार्थांचा नाश्ता बनविणाºया स्टॉल्सवरदेखील उपवासाचेच पदार्थ तयार करण्यात आले होते. मंदिरांमध्येदेखील केळी आणि राजगिरा लाडूचा प्रसाद देण्यात आला. काही ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली.
तर रक्तपेढीच्या वतीनेदेखील शिबिर लावण्यात आलेले होते. आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत शहर जिल्ह्यातील भाविकांनी गोदाकाठी स्नानाची पर्वणीही साधली.