'स्मार्ट सिटी'मार्फत गोदावरी सुशोभिकरणाची कामे; बांधकामाविरोधात जलाधिवास आंदोलन
By Suyog.joshi | Published: July 20, 2024 07:34 PM2024-07-20T19:34:50+5:302024-07-20T19:35:23+5:30
पुरातन वास्तूंची तोडफोड करत हा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न
नाशिक, सुयोग जोशी: स्मार्ट सिटीमार्फतगोदावरी सुशोभिकरणाची कामे करण्यात येत आहेत. मात्र, या कामांदरम्यान गोदा घाटावरी पुरातन वास्तूंची तोडफोड करत हा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याविरोधात शहरातील विविध पक्ष - संघटनांच्यावतीने शनिवार (२० जुलै) रोजी सकाळी पंचवटीत रामकुंड, गोदा घाटावर जलाधिवास आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
गोदा घाटावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेला घाट व गांधी तलाव हे काळ्या पाषाणातील मजबूत घाट आहेत. सुशोभिकरणाच्या नावाखाली या घाटाची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे नदीपात्र अधिकच अरूंद होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात धनगर विकास परिषद, सकल हिंदू समाज, नाशिक बचाव समिती, पर्यावरणप्रेमी, पुरोहीत संघ, संतसेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल, पंचवटी फोरमच्या प्रमुख कल्पना पांडे, धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिध्देश्वर शिंदे तसेच उद्धवसेना, काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणा देत होते. प्रदुषण मुक्त गोदावरी, मनपा प्रशासनाचा निषेध अशा अनेक घोषणांचे फलक लक्ष वेधून घेत होते.