गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग 

By अझहर शेख | Published: September 24, 2023 04:53 PM2023-09-24T16:53:07+5:302023-09-24T16:53:19+5:30

गोदावरी दुथडी भरून वाहताना बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

Godavari began to flow Discharge of 4544 cusecs from Gangapur | गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग 

गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग 

googlenewsNext

नाशिक : शहरात पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव सुरू असून ग्रामिण भागात जोर‘धार’ सुरू झाल्याने गंगापुर पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक हाेऊ लागली आहे. यामुळे शनिवारी (दि.२३) संध्याकाळपासून पुन्हा बंद केलेला विसर्ग ११३६क्युसेकने सुरू करण्यात आला. या विसर्गात सातत्याने वाढ होत असून रविवारी (दि.२४) दुपारी चार वाजता ४ हजार ५४४ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला. यामुळे दुतोंड्या मारूतीची मुर्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडाली. गोदावरी दुथडी भरून वाहताना बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

कुलाबा वेधशाळेने नाशिक जिल्ह्यासाठी रविवारपासून पुढे तीन दिवस ‘यलो अलर्ट’ दर्शविला आहे. पहाटेपासूनच शहरातील वातावरणात त्यानुसार बदल झालेला जाणवत आहे. ढगाळ हवामान असून दुपारी शहरातील देवळाली कॅम्प, नाशिकरोड, उपनगर, जेलरोड, अशोकामार्ग, वडाळागाव, इंदिरानगर या भागात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. पंचवटीसह शहराच्या मध्यवर्ती भागात मात्र पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव होत आहे. 

गंगापूर धरण क्षेत्र व पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाच्या मध्यम सरींचा जोर कायम असल्यामुळे धरणातून दिवसभर टप्प्याटप्प्याने विसर्ग गोदावरीत सोडला जात आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. अहल्यादेवी होळकर पूलाखालून दुपारी साडेचार वाजता पुढे रामकुंडात ४ हजार ८८१ क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित झालेला होता. दुपारी चार वाजता वाढविण्या आलेला विसर्गामुळे गोदावरीची पाणी पातळी संध्याकाळपर्यंत अजुन वाढणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामुळे गोदाकाठावरील विक्रेत्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

‘दुधस्थळी’ धबधबा खळाळला
गंगापूर धरणातून सातत्याने गोदापात्रात केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गंगापूर गावाजवळ असलेला प्रसिद्ध दुधस्थळी (सोमेश्वर) धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे मनोहारी रूप बघण्यासाठी रविवारी नाशिककरांनी गर्दी केली होती. यामुळे पुन्हा एकदा या प्रेक्षणिय स्थळाला वर्षा पर्यटनाचा बहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Godavari began to flow Discharge of 4544 cusecs from Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.