गोदावरी धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:34 AM2017-07-24T00:34:40+5:302017-07-24T00:35:11+5:30

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

Godavari at danger level | गोदावरी धोक्याच्या पातळीवर

गोदावरी धोक्याच्या पातळीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. काठावरील व्यावसायिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, नदीवरील पुलांवरून पुराचे पाणी वाहत आहे. सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे.  नाशिक शहर परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी गंगापूर धरण  क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. यामुळे सायंकाळी चार वाजेनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. धरणातून सकाळपासून विसर्ग सुरू होता. सकाळी आठ वाजेपासून धरणातून साडेदहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. सायंकाळी चार वाजेनंतर दोन टप्प्यात एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नदीपात्रावरील गाडगे महाराज, होळकर आणि लक्ष्मीनारायण हे पूल वगळता अन्य पूल पाण्याखाली गेले आहेत. होळकर पुलाच्या अगदी २५ फुटांवर पुराचे पाणी येऊन ठेपले आहे. कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून, पुराचे परिमाण मोजणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. काठावरील दुकानदारांनी टपऱ्या हलविल्या असून, दुकानदारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कळवण तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतपिकांचे व शेतीच्या बांधाचे नुकसान झाले. गिरणा ,पुनंद बेहडी,म्हशाड ,मार्कंडेश्वर आदी नद्या व नाल्यांना पूर आला असून गिरणा व पुनंद नदीकाठच्या नागरिकांना व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात रविवारी ४१ मिमि पाऊस पडला असून ५० टक्के पाणीसाठा असून चणकापूर प्रकल्पातून ४७८५ क्यूसेसने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले आहे. प्रकल्पात आज १५८० दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे, तर अर्जुनसागर (पुनंद)प्रकल्प ५२ टक्के भरले असून प्रकल्पातून पुनंद नदीपात्रात ५०२५ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा व पुनंदसाठा नदीला पूर आला आहे.  दिंडोरी शहरासह तालुक्यात रविवारी संततधार पावसाने हजेरी लावल्याने विविध नदी नाल्यांना पूर आले होते तर सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून पालखेड धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून डावा कालवा व कादवा नदीत पाणी सोडण्यात आले आहे .
पेठ तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून लहान मोठया सर्वच नद्यांना मोठया प्रमाणावर पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पेठ -जोगमोडी, पेठ -भूवन, करंजाळी -कोहोर, भायगाव -डोल्हारमाळ, मुरूमट्टी , आडगाव, उम्रद, बोंडारमाळ परिसरातील फरशी पुलावरून पुर पाण्याचा विसर्ग होत असल्याने गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे.
नांदूरमधमेश्वर धरणातून विसर्ग
पावसामुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले असून, शेती, वीटभट्टी यांसह बाजारतळात पाणी घुसले आहे. तीन दिवसांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. नांदूरमधमेशवर धरणाचे आठही गेट खुले केल्याने ६१ हजार १३८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सायखेडा आणि चांदोरी गावातील नदीलगतच्या वस्तीत पाणी शिरले आहे. सायखेड्यातील बाजारतळात पाणी गेल्याने या भागातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे काही धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.




 

Web Title: Godavari at danger level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.