गोदावरी दुथडी : गंगापूर धरणातून ७ हजार ८०० क्युसेकपर्यंत विसर्ग; हंगामातील पहिला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 08:33 PM2019-07-29T20:33:50+5:302019-07-29T20:40:29+5:30

रात्री आठ वाजता ७ हजार ८३३ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. दर दोन तासांनी हजार ते दीड हजार क्युसेकने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली.

Godavari Duthi: Dissolve from Gangapur Dam up to 4 thousand 5 cusecs; The first flood of the season | गोदावरी दुथडी : गंगापूर धरणातून ७ हजार ८०० क्युसेकपर्यंत विसर्ग; हंगामातील पहिला पूर

गोदावरी दुथडी : गंगापूर धरणातून ७ हजार ८०० क्युसेकपर्यंत विसर्ग; हंगामातील पहिला पूर

Next
ठळक मुद्देरात्रीतून विसर्गात वाढ होण्याची शक्यताहोळकर पूलाखालून ९ हजार ४७० दलघफू पाणी प्रवाहित

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली. सायंकाळी सहा वाजता ६ हजार ५०० क्यूसेक्सपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला. रात्री आठ वाजता ७ हजार ८३३ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. दर दोन तासांनी हजार ते दीड हजार क्युसेकने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली.
यावर्षी उशिराने पावसाला राज्यासह जिल्ह्यात सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये जुलैअखेर पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून नव्या स्वरूपात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली. गंगापूर धरणाचा साठा २० टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेत अंमलबजावणीही केली, मात्र जुलैअखेर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, अंबोली या भागात वरुणराजा जोरदार बरसल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली. पंधरवड्यात धरणसाठा निम्म्यावर पोहोचला, मात्र या १४ दिवसांत पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारी (दि.२९) सायंकाळी गंगापूर धरण ८३.४३ टक्के इतके भरले. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत सायंकाळपर्यंत मोठी वाढ झाली. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराच्या पायऱ्याही पुराच्या पाण्यात बुडाल्या.
दुपारपासूनच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठावर धरणातून केल्या जाणा-या विसर्गाची पूर्वसूचना दिली जात होती. यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ नदीकाठापासून आपली दुकाने सुरक्षितस्थळी हलविली. नीळकंठेश्वर मंदिर ते रामसेतू पुलापर्यंतच्या नदीकाठच्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तूंचा माल तत्काळ भरून घेत टप-या रिकाम्या केल्या. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही, तसेच दुर्घटनेलाही निमंत्रण मिळाले नाही. गंगापूर धरणातून होणाºया विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले होते. सायंकाळपर्यंत गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने राससेतू पुलाला पुराचे पाणी लागले होते.

होळकर पूलाखालून ९ हजार ४७० दलघफू पाणी प्रवाहित
गंगापूर धरणातून सोडण्यात आलेले ६ हजार ५०० क्युसेक पाणी तसेच दिवसभर शहरात सुरू असलेल्या पावसाच्या मध्यम सरींमुळे शहरातील पावसाचे पाणी असे एकूण गोदावरीच्या होळकर पुलाखालून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९ हजार ४६७० दलघफूपर्यंत पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे तपोवनामधील लोखंडी पूलावरून पाणी गेले.
---
रात्रीतून विसर्गात वाढ होण्याची शक्यता
गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याचा जोर टिकून राहिल्यास रात्रीतून विसर्गात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाकाठालगत ‘हाय अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे. निफाड तालुक्यात गोदाकाठी राहणाºया नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Godavari Duthi: Dissolve from Gangapur Dam up to 4 thousand 5 cusecs; The first flood of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.