ढोल ताशांच्या गजरात गोदावरीच्या राजाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:18 AM2022-08-31T11:18:41+5:302022-08-31T11:20:09+5:30
राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली.
अशोक बिदरी
मनमाड (नाशिक)
राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली. यंदाचे २६ वे वर्ष असुन मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस मध्ये ढोल - ताश्याच्या गजरात गोदावरीचा राजा श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी शहरातील लहान बालके, वयोवृद्ध, तरून, महिला मंडळ, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस मोठ्या संख्येने मनमाड रेल्वेस्थानकावर गणेश स्थापना साठी उपस्थित होते.
गेल्या २६ वर्षापासून गणेश चतुर्थी निमित्त गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते.राज्यात हा उत्सव प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणरायाची रेल्वेची मुंबई वारी हुकली होती. यंदा मात्र कोरोना नियम शिथिल झाल्याने गणरायाची दहा दिवस मुंबईवारी निश्चित झाली आहे.प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली. बोगीमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा नियम व विज बचतीचे संदेश असलेले स्टिकर लावून जनजागृती करण्यात येत आहे. ढोल ताशां आणि बॅंडच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरला होता.यावेळी देशातील सर्व प्रवाश्यांच्या प्रवास सुखाचा व्होवो असे साकडे गगणरायाला घालण्यात आले.