गोदावरीचा पूर वाढला ; गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:23 AM2019-07-31T01:23:40+5:302019-07-31T01:24:02+5:30
नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची जोरदार आवक होत असल्याने दुपारपासून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. रात्री नऊ वाजेपर्यंत ८ हजार ८३३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात कायम होता. त्यामुळे गोदेच्या पुराच्या पातळीत मंगळवारी दुपारपासून वाढ होऊन दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत बुडाली होती. तसेच शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत २१.७ मिमीपर्यंत पाऊस पडला.
पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविला जाणार आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून, धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गंगापूर धरणक्षेत्रात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८४ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला, तर अंबोलीत ७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
सोमवारी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता एक हजार क्यूसेक विसर्ग वाढविण्यात आला. रात्रीपर्यंत ८ हजार ८३३ क्यूसेक इतके पाणी धरणातून नदीपात्रात प्रवाहित करण्यात आले होते. शहरातदेखील पहाटेपासून संततधार सुरू असल्यामुळे तसेच दुगावजवळील आळंदी धरणातूनही २४३ क्यूसेकचा विसर्ग होत असल्याने अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात रात्री आठ वाजता १२ हजार ३०० क्यूसेक पाणी नदीपात्रात वाहत होते. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गोदाकाठावरील नारोशंकर मंदिराच्या सर्व पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. रामसेतू पुलाला पाणी लागले होते.
तरीदेखील पुलावर भाजीविक्रेत्यांनी आपला व्यवसाय दुपारी सुरूच ठेवल्याचे चित्र पहावयास मिळाले. पुलाला पाणी लागले असताना पोलिसांनी या पुलावर प्रवेश बंद करण्याची मागणी होत आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी सकाळी व सायंकाळी होळकरसह अन्य मोठ्या पुलांवर गर्दी केली होती.
दुचाकीस्वाराचे जीव घेणे धाडस
मंगळवारी गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सोमेश्वर धबधब्याने रौद्ररुप धारण केले होते. धबधब्यावरील आरुंद पुलावरुनदेखील पाणी वाहत असताना एका दुचाकीस्वाराने पाण्याच्या प्रवाहातून दुचाकी चालविण्याचे जीव घेणे धाडस केल्याने हे दृश्य पाहणाºया काठवरील नागिरकांच्या काळजाचा ठोका चुकला.
धरण क्षेत्रातील पाऊस असा... (मि.मी.)
मंगळवारी (सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) गंगापूर - ८४, कश्यपी- ४२, गौतमी- ४०, त्र्यंबकेश्वर- ३७, अंबोली- ७९. तसेच सोमवारी सायंकाळी ६ ते मंगळवारी पहाटे ६ वाजेपर्यंत गंगापूरला ८०, कश्यपीमध्ये ८६, गौतमी- ११७, त्र्यंबकेश्वर- १२८, अंबोली- १५२ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली.
जाणून घेऊया पावसाचे गणित...
२५.४ मिमी : १ इंच
१ घनफूट : २८.३१ लिटर्स पाणी
१ एमसीएफटी : १ दशलक्ष घनफूट (१० लाख घनफूट पाणी)
१ टीएमसी : १,००० दशलक्ष घनफूट
(१ अब्ज घनफूट पाणी)
१ घनफूट प्रतिसेकंद :
१ क्यूब प्रतिसेकंद