गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्याने गोदावरीला पुन्हा पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:16 AM2019-09-10T01:16:58+5:302019-09-10T01:17:21+5:30
सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ३ हजार ४२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
नाशिक : सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ३ हजार ४२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामुळे गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली, तर गंगा गोदावरी मंदिरालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला. संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले.
सुमारे वीस दिवसांपासून पावसाने शहरात उघडीप दिली होती; मात्र पुन्हा मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आहे. सोमवारी पहाटेपासून शहरात सरींनी चांगला जोर धरला. पहाटेपासून मध्यम सरींची संततधार सुरू झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.८ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला गेला. तसेच जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने या दोन्ही धरणांमधून विसर्ग वाढविला गेला. गोदावरीच्या पातळीत दुपारी २ वाजेनंतर कमालीची वाढ झाली. यामुळे रामकुं ड, देवमामलेदार मंदिर, निळकंठेश्वर मंदिर परिसरातील विक्रेत्यांची यामुळे धावपळ उडाली. विक्रेत्यांनी सरदार चौक-कपालेश्वर मंदिर रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली होती. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर रात्रीतून पुन्हा वाढल्यास मंगळवारी विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.
गंगापूर गावाजवळील बालाजी मंदिराजवळ असलेला दूधस्थळी (सोमेश्वर) धबधबा महिनाभरानंतर पुन्हा खळाळला. गंगापूर धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्यामुळे धबधबा खळाळला आहे.
विसर्जनाला जाताना खबरदारी घ्या
गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषत: गणपती विसर्जनासाठी जाताना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबावे, गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करून दान करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तीन दिवसांपूर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही.