Video: नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान
By अझहर शेख | Published: September 1, 2022 05:21 PM2022-09-01T17:21:42+5:302022-09-01T17:24:12+5:30
गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच
नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. गुरुवारी (दि.३१) सकाळपासूनच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. रात्री गांधी ज्योत परिसरात असलेल्या एका मंदिराजवळ झोपलेल्या तिघांना नदीला आलेल्या पाण्यामुळे बाहेर येणे अशक्य झाले होते. त्यामुळे ते तेथेच अडकून पडले. गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात वाढ केली जात असल्याने नदीचा वाढणारा जलस्तर बघून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ही बाब लक्षात येताच आदिवासी जीव रक्षकांनी धाव घेत चौघांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.
गोदावरी नदीकाठालगत गांधी ज्योत परिसरात फिरस्त्यांचा वावर असतो. संपुर्ण गोदाकाठ हा फिरस्त्या, भटक्या लोकांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. तिघा जणांना पाण्याबाहेर काढले तर इतर एक जण मंदिर परिसरातच झोपलेला असल्याने त्याला गुरूवारी सकाळी रेस्क्यू करण्यात आले. या तिघा जणांना पाण्याबाहेर सुखरूप बाहेर काढता आले तर इतर चौथा व्यक्ती वाहत्या पाण्यामुळे अडकून पडल्याने आदिवासी जीव रक्षक दलाचे विशाल जाधव, रोहित वाघमारे, दुर्गेश वाघमारे, संजोग सोळंके आदींनी दोरीच्या साह्याने वाहत्या पाण्यात उतरून गुरुवारी सकाळी त्यास सुरक्षितरित्या वाचविले.
नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान pic.twitter.com/3yMxkq3geD
— Lokmat (@lokmat) September 1, 2022
दोघा यात्रेकरूंना वाचविले
बुधवारी मध्यरात्री शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. गंगापूर धरणातून पहाटेपासून दिवसभर मोठा विसर्ग गोदापात्रात केला जात होता. यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. दुपारच्या सुमाराला रामसेतू पुलाखाली असलेल्या सातीआसरा मंदिराजवळ नदीपात्रात दोघे यात्रेकरू भाविक पाण्यात वाहून जात होते. ही बाब येथील दीपक जगताप व गणेश शिरपाली यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उड्या घेऊन त्या दोघांचे प्राण वाचविले. हे दोघेही युवक परराज्यातून आलेले भाविक असल्याचे पोलिसांनी सांगितले.