गोदावरीला पूर, रस्त्यांवर तळी

By admin | Published: July 15, 2017 12:26 AM2017-07-15T00:26:39+5:302017-07-15T00:26:56+5:30

नाशिक : पुनर्वसू नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाने गुरुवारी (दि. १३) रात्रीपासून संततधार लावल्यानंतर चालू मोसमात गोदावरी नदीला पहिल्यांदा पूर आला.

Godavari floods, ponds on the streets | गोदावरीला पूर, रस्त्यांवर तळी

गोदावरीला पूर, रस्त्यांवर तळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पुनर्वसू नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाने गुरुवारी (दि. १३) रात्रीपासून संततधार लावल्यानंतर चालू मोसमात गोदावरी नदीला पहिल्यांदा पूर आला. नाशिककरांचे पूर मोजण्याचे परिमाण असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी जाऊन पोहोचले होते. शुक्रवारी (दि. १४) सकाळी पावसाचा जोर वाढल्याने शहरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाण्याची तळी साचून वाहतूक विस्कळीत झाली, तर पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन सायंकाळपर्यंत ६२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जाऊन पोहोचला होता. दरम्यान, दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवनावर परिणाम झाला.
आर्द्रा नक्षत्राच्या पावसानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अधूनमधून पावसाचे शिडकावे होत असले तरी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. १३) रात्री पावसाने संततधार लावली आणि शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी वाहू लागले. सकाळी ४८.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली. गंगापूर व आळंदी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नाल्यांद्वारे वाहून आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सकाळी १० वाजेनंतर गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर महापालिकेच्या आपत्कालीन विभागामार्फत नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.  गोदाघाट परिसरातील व्यावसायिकांनीही आपापले साहित्य, टपऱ्या अन्यत्र नेण्यास सुरुवात केली. सुमारे ४५०० क्यूसेक इतका पाण्याचा प्रवाह असल्याने दुपारपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. गोदाघाटावर पार्क केलेली एक कारही वाहून जात असताना काही तरुणांनी दोरखंड लावून ती पुराच्या पाण्यातून ओढून काढली. दुपारच्या सुमारास मोरे मळा परिसरातील नाल्यातून एक शाळकरी मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली परंतु, अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू ठेवूनही मुलाचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान, मखमलाबादरोडवर झाड उन्मळून पडल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले तर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याची तळी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ड्रेनेज व पावसाळी गटारीचे चेंबर मोकळे करत पाण्याचा निचरा केल्याचा दावा केला असला तरी सायंकाळपर्यंत अनेक भागात परिस्थिती ‘जैसे थे’ होती. दुपारनंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती थोडीफार पूर्वपदावर येण्यास मदत झाली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही पाणीसाठा ६२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

 

Web Title: Godavari floods, ponds on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.