गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:37 AM2018-03-11T01:37:50+5:302018-03-11T01:37:50+5:30

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यतीर्थावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करणाºया व्यक्तिमत्त्वांवर कौतुकाचा अभिषेक घालण्यात आला.

Godavari Gaurav: Greetings of gratitude on behalf of Kusumagraj Pratishthan, 'Abhishek' on the praises of 'Literature' field! | गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक !

गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक !

Next
ठळक मुद्देआठही कर्तृत्ववान व्यक्तींना मनोभावे कृतज्ञतेचा नमस्कार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यतीर्थावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करणाºया व्यक्तिमत्त्वांवर कौतुकाचा अभिषेक घालण्यात आला आणि शुभ्रधवल सद्गुणांचा प्रवाह गोदावरीत येऊन मिसळला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि.१०) सायंकाळी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘गोदावरी गौरव’चे वितरण करण्यात आले आणि उपस्थित अवघ्या नगरजनांनी आठही कर्तृत्ववान व्यक्तींना मनोभावे कृतज्ञतेचा नमस्कार केला. १९९२पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. यावर्षी गंगापूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘संगीत’ या क्षेत्रात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, ‘लोकसेवा’ क्षेत्रात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, ‘चित्रपट आणि नाट्य’ क्षेत्रात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ‘ज्ञान’ या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ‘चित्र-शिल्प’ या क्षेत्रात आंतरराष्टÑीय ख्यातीचे चित्रकार सुभाष अवचट आणि ‘साहस’ या प्रकारात मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी, मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले, कुसुमाग्रज हे महाकवी, महामानव होते. माणूस म्हणून समाजाकडे व्यापक दृष्टीने पाहणारा हा कवी होता. कुसुमाग्रजांनी आयुष्यभर जीवनावर प्रेम केले. गोदावरी गौरव पुरस्कार हा कुसुमाग्रजांचा दैवी प्रसाद असल्याचेही कर्णिक यांनी सांगितले.
आदिवासी संस्कृतीत स्त्रीचा सन्मान
डॉ. स्मिता कोल्हे यांनी आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना मिळणारा सन्मान आणि त्यांच्या मनांची श्रीमंती यावर प्रकाश टाकला. कोल्हे म्हणाल्या, शहरी भागात बेटी बचाव आंदोलने करावी लागतात. परंतु, आदिवासी भागात स्त्रीभ्रूण हत्या होतच नाहीत. आदिवासी संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे. मुलीच्या जन्माचा तेथे उत्सव केला जातो. आम्हाला तेथे अनाथालय, वृद्धाश्रम काढायचे होते परंतु, तेथे अनाथ मुलेही नाहीत आणि माता-पित्यांचा सांभाळ करणारी मुले असल्याने वृद्धाश्रमाची गरज नाही, असे सांगत कोल्हे यांनी कुपोषित बालके तेथील कुटुंबाचा आधार कसा बनतात, याची हृदयस्पर्शी कथाच ऐकविली.
पोलिसांबाबत नकारात्मकता सोडा
सुदर्शन शिंदे यांनी मुंबई पोलिसाचा आपण एक भाग असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. पोलीस हे सर्व स्तरावर आपली भूमिका निभावत असतात. काही लोकांमुळे पोलिसांबाबत असलेली नकारात्मकता सोडा. त्यांच्या पाठीवर वेळेत शाबासकी मिळाली तर ते खूप काही करू शकतील. परंतु, त्यांचे खच्चीकरण होत असल्याबद्दल शिंदे यांनी खंतही व्यक्त केली. आपण मनात आणले तर एखाद्या समाजसेवकापेक्षाही खूप मोठे काम करू शकतो, असेही शिंदे यांनी सांगितले.
जुन्या-नव्यांची सांगड
डॉ. स्नेहलता देशमुख म्हणाल्या, नव्या-जुन्यांची सांगड कशी घालावी, हे कुसुमाग्रजांकडूनच शिकले पाहिजे. माणुसकीचा आधार घेऊन शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. मुंबई विद्यापीठात कुलगुरूपदी कार्यरत असताना दाखल्यावर वडिलांसोबत आईचेही नाव समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो नंतर सर्व विद्यापीठांनी स्वीकारला. यावेळी डॉ. देशमुख यांनी तात्यासाहेबांच्या काही काव्यपंक्ती सादर करत मिळालेला पुरस्कार आपल्या आईला समर्पित केला.
तात्यासाहेब माझ्यापाशी नाहीत
चित्रकार सुभाष अवचट यांनीही तात्यासाहेबांसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. तात्यासाहेब हे शब्दमहर्षि होते. त्यांची व माझी परिभाषा वेगळी असली तरी मैत्रीचा एक पक्का धागा सोबत होता. साधना परिवार या अजब विद्यापीठातूनही मला खूप काही शिकायला मिळाले. एस. एम. जोशी, प्रधान मास्तर, बाबा आमटे यांच्या सहवासात मी वाढलो. त्यांनी एक दृष्टी दिली. माझ्या प्रत्येक प्रदर्शनापूर्वी तात्यासाहेब शुभेच्छापत्र पाठवित असत. तो मला मोठा आधार वाटायचा. आज तात्यासाहेब माझ्यापाशी नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कुसुमाग्रजांची काव्यसंपदा जवळची
पंडित सत्यशील देशपांडे यांनी सांगितले, कुसुमाग्रज हे महाकवी होते. त्यांची काव्यसंपदा मला जवळची वाटायची. कुसुमाग्रजांची कविता गाऊनच माझे टीव्हीवर पदार्पण झाले होते. माफक काव्य ही बंदिशीची गरज आहे. संगीत विचार पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल, अशी भावनाही देशपांडे यांनी व्यक्त केली.
व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे बळ
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सांगितले, कुुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर या दोन्ही उत्तुंग व्यक्तींनी मलाच नव्हे तर माझ्या संपूर्ण पिढीला भरभरून दिले आहे. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. संवेदना विकसित केल्या. सांस्कृतिक वारसा दिला. सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना उत्तम साहित्य सहजगत्या उपलब्ध होत होते. त्यातून आमची साहित्य व सौंदर्यविषयक जाण विकसित होत गेली. मी जेव्हा जेव्हा व्यवस्थेविरुद्ध लढा देतो त्यावेळी तात्यासाहेबांच्या शब्दांतूनच लढण्याचे बळ मिळते. ‘फक्त लढ म्हणा’ या तीन शब्दांतून आशीर्वाद प्राप्त होतो, असे सांगत पालेकर यांनी गोदावरी गौरव हा पुरस्कार आशीर्वादच असल्याचे सांगितले.

Web Title: Godavari Gaurav: Greetings of gratitude on behalf of Kusumagraj Pratishthan, 'Abhishek' on the praises of 'Literature' field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.